Ratnagiri News: नाम फाउंडेशनतर्फे ‘वाशिष्ठी’त गाळ उपशाला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 18:15 IST2023-02-18T18:14:16+5:302023-02-18T18:15:44+5:30
दुसऱ्या टप्प्यातील गाळ उपसा धीम्या गतीने

Ratnagiri News: नाम फाउंडेशनतर्फे ‘वाशिष्ठी’त गाळ उपशाला सुरुवात
चिपळूण : पूरमुक्त चिपळूण शहरासाठी पुढाकार घेतलेल्या नाम फाउंडेशनने वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा कामाला सुरुवात केली आहे. या कामाचा शुभारंभ नामचे मल्हार पाटेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. प्रशासन, जलसंपदा विभाग, चिपळूण बचाव समिती आणि जनता या सर्वांच्या सहयोगातून पहिल्या टप्प्यातील गाळ उपशाचे उद्दिष्ट नक्कीच पूर्ण करू, असा विश्वास नाम फाउंडेशनचे विश्वस्त मल्हार पाटेकर यांनी व्यक्त केला.
दुसऱ्या टप्प्यातील गाळ उपसा धीम्या गतीने सुरू असल्याने राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मुंबईत बैठक घेतली हाेती. या बैठकीत वाशिष्ठी नदीतील पहिल्या टप्प्यातील शिल्लक सर्व गाळ काढण्याची जबाबदारी नाम फाउंडेशनवर सोपविण्यात आली.
प्रशासनाकडून आपल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळताच नाम फाउंडेशनने लाँग रिच बूम मशीनसह पाच पोकलेन व पाच डंपर चिपळुणात पाठविले. नाम फाउंडेशन व जलसंपदा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या या मोहिमेचा शुभारंभ पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
शहरातील बाजारपूल परिसरातील गणेश विसर्जन घाट येथे गाळ उपसा कामाचा श्रीफळ वाढवण्यात आला. गाळ उपसा कामात कोणतीही अडचण अथवा समस्या निर्माण झाल्यास आवाज द्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि कायम सोबत राहू, अशी ग्वाही बचाव समितीचे बापू काणे यांनी दिली. त्यानंतर जुवाड-उक्ताड बेट, गोवळकोट धक्का या भागातही गाळ उपसा कामाची सुरुवात करण्यात आली.
त्यानंतर पाटेकर यांनी गाळ उपसा करणाऱ्या ठिकाणांची व कामाची पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी प्रवीण पवार, चिपळूण बचाव समितीचे अरुण भोजने, किशोर रेडीज, राजेश वाजे, उदय ओतारी, शाहनवाज शाह, नाम फाउंडेशनचे कोकण समन्वयक समीर जानवलकर, चिपळूण समन्वयक महेंद्र कासेकर, मंदार चिपळूणकर, छाया सकपाळ, पंचायत समिती सदस्य पूजा निकम, जफर कटमाले, पृथ्वी पवार, सचिन साडविलकर व अधिकारी उपस्थित होते.