Ratnagiri: मुंबई - गोवा महामार्गाची डेडलाइन पुन्हा एकदा हुकलीच; बरेच काम बाकी, पूल अर्धवट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 12:59 IST2024-12-31T12:58:27+5:302024-12-31T12:59:32+5:30

परशुराम ते वाकेड मार्ग पूर्णत्त्वासाठी आता ३० नोव्हेंबरची प्रतीक्षा

Mumbai Goa highway deadline missed once again, A lot of road work remains | Ratnagiri: मुंबई - गोवा महामार्गाची डेडलाइन पुन्हा एकदा हुकलीच; बरेच काम बाकी, पूल अर्धवट

छाया-अरुण आडिवरेकर

रत्नागिरी : मुंबई - गाेवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रखडलेले काम डिसेंबर २०२३पर्यंत पूर्ण करण्याची डेडलाइन देण्यात आली होती. मात्र, आरवली (ता. संगमेश्वर) ते वाकेड (ता. लांजा) दरम्यानचे काम दोन ठेकेदारांनी अचानक सोडल्याने काम रखडले. या कामाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डिसेंबर २०२४अखेर काम पूर्ण होईल, अशी घोषणा केली होती. मात्र, ३१ डिसेंबरचाही मुहूर्त आता हुकला आहे.

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमधून ३६६.१७ किलोमीटरच्या महामार्गाच्या चाैपदरीकरणाला २०१३मध्ये प्रारंभ झाला आहे. माणगाव ते परशुराम घाट या ७० किलोमीटरच्या चार भागांचे काम राष्ट्रीय महामार्ग विभाग, पेण (जि. रायगड) यांच्याकडे आहे. परशुराम घाट ते तळगाव (ता. राजापूर) हे ५ ते ८ भागांपर्यंतचे २१३ किलोमीटरचे आणि तळगाव ते झाराप हे ८२.८७ किलोमीटरचे काम राष्ट्रीय महामार्ग विभाग, रत्नागिरी यांच्याकडे आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील आरवली ते कांटे हे ३९.२४ किलोमीटर आणि कांटे ते वाकेड हे ४९.१५ किलोमीटरचे काम रखडले आहे. महामार्गाचे रखडलेले काम डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण हाेईल, असे सांगण्यात आले हाेते. त्यानंतर मार्च महिन्यात रत्नागिरी दाैऱ्यावर आलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डिसेंबर २०२४ पर्यंत काम पूर्ण करण्याची घोषणा केली होती. मात्र, हा मुहूर्तही हुकला आहे.

परशुराम घाट ते आरवली ९३ टक्के 

तळगाव ते कळमठ हे ३८.३८ किलाेमीटरचे आणि कळमठ ते झाराप हे ४३.९० किलोमीटरचे काम पूर्णत्त्वाला गेले आहे. परशुराम घाट ते आरवली या रस्त्याचे कामही ९३ टक्के झाले आहे. कामासाठी आता ३१ मार्च २०२५ची डेडलाइन देण्यात आली आहे.

आरवली ते वाकेड काम रखडले

आरवली ते कांटे या ३९.२४ किलोमीटरपैकी २४.५० किलाेमीटर (६० टक्के) आणि कांटे ते वाकेड या ४९.१५ पैकी ४१.३० किलोमीटरचे (७४ टक्के) काम झाले आहे. उर्वरित कामासाठी आता ३० नोव्हेंबर २०२५ची डेडलाइन दिली आहे.

Web Title: Mumbai Goa highway deadline missed once again, A lot of road work remains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.