राष्ट्रवादी-शिंदे सेनेत धुसफुस?, अजित पवारांच्या स्नेहभोजनावरुन भास्कर जाधवांचा मिश्किल टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 15:36 IST2025-07-30T15:35:27+5:302025-07-30T15:36:48+5:30
४ गेले तर ४० जण तयार करण्याची धमक

राष्ट्रवादी-शिंदे सेनेत धुसफुस?, अजित पवारांच्या स्नेहभोजनावरुन भास्कर जाधवांचा मिश्किल टोला
रत्नागिरी : उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोणताच दिवस, वार, तिथी पाळत नाहीत. त्यांच्याकडे नेहमीच मांसाहारी जेवण असते आणि शिंदे सेनेच्या मंत्र्यांचा श्रावण असेल म्हणून ते त्यांच्याकडे जेवणासाठी गेले नसावेत, असा मिश्किल टोला उद्धव सेनेचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी हाणला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलवलेल्या स्नेहभोजनाला केवळ एकनाथ शिंदे उपस्थित होते. मात्र शिंदे सेनेचा एकही मंत्री नव्हता. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिंदे सेना यांच्यामध्ये धुसफुस आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याबाबत आमदार जाधव यांनी हा मिश्किल टोला हाणला.
अजित पवार यांच्यासोबत आपण पंधरा वर्षे काम केले आहे. ते नेहमी उत्तमोत्तम मांसाहारी जेवण खाऊ घालतात. मात्र सध्या श्रावण सुरू आहे, हे त्यांच्या लक्षात नसावे. बहुदा म्हणूनच शिंदे सेनेचे मंत्री त्यांच्याकडे जेवायला गेले नसावेत, असे भास्कर जाधव यांनी गुहागर येथे पत्रकारांशी बोलताना मिश्किलपणे सांगितले.
भास्कर जाधव यांची पक्ष सोडून गेलेल्यांबाबतची एक पोस्ट मंगळवारपासून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. जे सोडून गेले, त्यांच्याबद्दल आपण कधीच वाईट बोलत नाही. मात्र जेव्हा आपल्यावर बोलण्याची वेळ येते तेव्हा आपण अजिबात सोडत नाही, असेही ते म्हणाले.
४ गेले तर ४० जण तयार करण्याची धमक
जे उद्धवसेना सोडून गेले आहेत, ते इतरांना आपल्यासोबत येण्याचा आग्रह करत आहेत. मात्र सोडून गेले लोक भावनिकतेला बळी पडले आहेत. अर्थात ४ जण सोडून गेले तर ४० जण तयार करण्याची धमक अजूनही आपल्याकडे आहे आणि आपण ते करून दाखवू, असेही जाधव यांनी या व्हायरल पोस्ट बाबत सांगितले.