संगमेश्वरच्या बेपत्ता महिलेच्या वस्तू चिपळुणातील गांधारेश्वर पुलावर; बेपत्ता, आत्महत्या की घातपात याबाबत संभ्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 13:49 IST2025-09-25T13:49:26+5:302025-09-25T13:49:53+5:30
घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेल्या

संगमेश्वरच्या बेपत्ता महिलेच्या वस्तू चिपळुणातील गांधारेश्वर पुलावर; बेपत्ता, आत्महत्या की घातपात याबाबत संभ्रम
चिपळूण : शहरातील गांधारेश्वर नदीच्या पुलावर एका महिलेची चप्पल, पर्स आणि मोबाइल सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या महिलेने नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. संबंधित महिला संगमेश्वर तालुक्यातील धामापूर येथील असून, घरात कोणालाही काही न सांगता निघून गेली होती. त्यामुळे तिच्या पतीने ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे. पोलिस तिचा शोध घेत आहेत.
धामापूर येथील अपेक्षा अमोल चव्हाण (४०) या मंगळवारी २३ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेल्या. रात्रीपर्यंत त्या परत न आल्यामुळे त्यांचे पती अमोल चव्हाण यांनी बुधवारी २४ राेजी सकाळी संगमेश्वर पोलिस स्थानकात ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.
त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या मोबाइल लोकेशनची तपासणी केली असता, तिचे शेवटचे लोकेशन चिपळूण येथील गांधारेश्वर पुलावर दिसून आले. या माहितीच्या आधारे चव्हाण कुटुंब तातडीने गांधारेश्वर पुलावर पोहोचले. तेथे त्यांना पुलावर अपेक्षाची चप्पल आणि पर्स सापडली, ज्यामुळे त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
सध्या पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या महिलेने खरोखरच पुलावरून उडी मारून आत्महत्या केली की, आत्महत्येचा बनाव करून ती अन्यत्र गेली याबाबत पोलिस तपास करत आहेत.