Ratnagiri: देवरुख येथे विवाहितेचा बाथरूममध्ये जळून मृत्यू; घटनास्थळी डिझेलची बाटली, तपास सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 18:02 IST2025-12-25T18:01:43+5:302025-12-25T18:02:39+5:30
देवरुख पोलिस स्थानकात ‘आकस्मिक मृत्यू’ची नोंद करण्यात आली

Ratnagiri: देवरुख येथे विवाहितेचा बाथरूममध्ये जळून मृत्यू; घटनास्थळी डिझेलची बाटली, तपास सुरू
देवरुख : येथील वरची आळी येथे एका ३० वर्षीय विवाहितेचा घराबाहेरील बाथरूममध्ये जळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २२) पहाटेच्या सुमारास घडली आहे. अक्षरा अरविंद मोहिते असे या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी देवरुख पोलिस स्थानकात ‘आकस्मिक मृत्यू’ची नोंद करण्यात आली असली तरी त्यांनी आत्महत्या केली असावी असा संशय पोलिसांना आहे.
देवरुख पोलिस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.२१) रात्री अक्षरा या नेहमीप्रमाणे जेवण करून घरात झोपल्या होत्या. त्यांचे पती वाहनचालक म्हणून काम करतात. त्या रात्री ते घरी नव्हते. घरामध्ये अक्षरा, त्यांचा सात वर्षाचा मुलगा आलोक आणि त्यांच्या पतीची मावशी असे तीनच लोक होते.
सोमवारी (दि.२२) पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास आलोकला लघुशंकेसाठी जाग आली. त्यावेळी त्याला आई बिछान्यावर दिसली नाही. त्याने घरातच राहणाऱ्या वडिलांच्या मावशी ताराबाई शिंदे यांना उठविले. ताराबाई आणि आलोक यांनी घरात शोधाशोध केली, मात्र अक्षरा दिसल्या नाहीत. घाबरलेल्या मुलाने आणि ताराबाई यांनी शेजारी राहणारे काका दत्ताराम तुकाराम मोहिते यांना उठवून हा प्रकार सांगितला. त्यानंतर सर्वांनी मिळून पुन्हा शोध घेतला असता, घराबाहेरील बाथरूममध्ये अक्षरा या भाजलेल्या अवस्थेत आढळल्या.
नातेवाईकांनी आणि स्थानिकांनी घटनेची माहिती तत्काळ देवरुख पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अर्धवट जळालेल्या अवस्थेतील अक्षरा यांना तत्काळ देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
घटनास्थळी डिझेलची बाटली, माचिस
पंचनाम्यावेळी घटनास्थळी डिझेलची बाटली आणि माचिस सापडली असल्याने अक्षरा यांनी आत्महत्या केली असावी असे सकृतदर्शनी दिसते . त्यांनी पेटवून घेतले की अन्य कोणत्या कारणामुळे त्या जळाल्या याचा तपास सुरू असल्याचे देवरुख पोलिसांनी सांगितले.