Ratnagiri Crime: संकेतस्थळावरून लग्न ठरलं, तरुणीने साडेसहा लाखांना फसवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 12:23 IST2025-08-29T12:23:17+5:302025-08-29T12:23:45+5:30
संगमेश्वर पाेलिस स्थानकांत गुन्हा दाखल

Ratnagiri Crime: संकेतस्थळावरून लग्न ठरलं, तरुणीने साडेसहा लाखांना फसवलं
देवरुख : अमरावती/नागपूर येथील एका विवाह संस्थेच्या संकेतस्थळावर लग्न जुळलेल्या संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते-विरतवाडी येथील एका तरुणाला ठाणे येथील तरुणीने चक्क ६ लाख ६२ हजार ६१० रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समाेर आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून ही फसवणूक केल्याप्रकरणी संगमेश्वर पाेलिस स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत नितीन प्रकाश बांबाडे (वय ३२) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रियंका विनोद लोणारे (रा. ठाणे) हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश बांबाडे यांनी स्वत:च्या लग्नाकरिता अमरावती/नागपूर येथील एका विवाह संस्थेच्या संकेतस्थळावर बायोडाटा भरला हाेता. त्यानंतर त्या संस्थेकडून प्रकाश बांबाडे यांना प्रियंका हिचा बायोडाटा देण्यात आला. बांबाडे आणि ती तरुणी एकमेकांना पसंत पडल्यानंतर ते एकमेकांशी फोनवर बोलू लागले.
त्यानंतर प्रियंकाने आपण लग्न करू या, असेही सांगितले. याचदरम्यान दि. ६ मार्च २०२५ ते २६ ऑगस्ट २०२५ रोजी तिने तिच्या किरकोळ खर्चाकरिता, तिच्या अपेंडिक्स आजाराच्या शस्त्रक्रियेकरिता व एम्ब्रॉयडरीचे मशीन खरेदीकरिता ३ लाख १३ हजार ६१० रुपये आणि ३ लाख ४९ हजार रुपये, असे एकूण ६ लाख ६२ हजार ६१० रुपये घेतले. ही रक्कम परत करतो, असे सांगून घेतलेली रक्कम तिने अद्याप परत केली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर नितीन बांबाडे यांनी फिर्याद दिली.