Local Body Election: रत्नागिरीत महायुतीसह महाविकास आघाडीला फटका, ४५३ उमेदवार रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 17:21 IST2025-11-22T17:21:02+5:302025-11-22T17:21:39+5:30
७ नगराध्यक्ष पदांसाठी तब्बल ४३ उमेदवार

Local Body Election: रत्नागिरीत महायुतीसह महाविकास आघाडीला फटका, ४५३ उमेदवार रिंगणात
रत्नागिरी : इच्छुकांची वाढलेली संख्या, जागा वाटपातील अडचणी यामुळे जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीला फटका बसला आहे. महायुतीने आपली पडझड बऱ्याच अंशी सावरली असली तरी महाविकास आघाडीला मात्र अनेक ठिकाणी फटका बसला आहे. दरम्यान, अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जिल्ह्यात नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या ५० उमेदवारांपैकी ७ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे नगराध्यक्षांच्या ७ जागांसाठी ४३ उमेदवार रिंगणार आहेत. नगरसेवकांच्या पदांसाठी पात्र ठरलेल्या ५४४ उमेदवारांपैकी ९१ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता नगरसेवकांच्या एकूण १५१ जागांसाठी ४५३ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.
रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, खेड या चार नगर परिषदा आणि गुहागर, देवरूख आणि लांजा या तीन नगरपंचायतींमधील नगराध्यक्षांच्या ७ जागांसाठी ५० उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. तर नगरसेवकांच्या एकूण १५१ जागांसाठी ५४४ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. १९ नोव्हेंबरपासून अर्ज माघारी घेण्यास प्रारंभ झाला आहे. शुक्रवारी (दि. २१ नोव्हेंबर) शेवटच्या दिवसापर्यंत या सात स्वराज्य संस्थांमधील नगराध्यक्षाच्या जागेसाठी पात्र ठरलेल्या ५० पैकी ७ उमेदवारांनी या तीन दिवसांत अर्ज मागे घेतले आणि नगरसेवकाच्या जागांसाठी पात्र ठरलेल्या ५४४ उमेदवारांपैकी ९१ जणांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सात नगराध्यक्षांच्या जागांसाठी ४३ उमेदवार आणि नगरसेवकांच्या १५१ जागांंसाठी ४५३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
२६ नोव्हेंबर रोजी या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. याच दिवशी या उमेदवारांना निवडणूक चिन्हेही दिली जाणार आहेत.
महायुती संपली, युती बाकी
रत्नागिरी, चिपळूण, गुहागर या तीन ठिकाणी महायुतीमधधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) बाहेर पडली आहे. तेथे फक्त शिंदे सेना आणि भाजपची युती आहे. याखेरीज राजापूर, लांजा येथे अनेक जागांवर तर रत्नागिरीत एका जागेवर भाजपने बंडखोरी केली आहे. त्यामुळे महायुतीत फूट पडली आहे. देवरुख आणि खेडमध्ये महायुती म्हणून तीन पक्ष एकत्र आहेत.
महाविकास आघाडीत मोठी बिघाडी
- महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीला जिल्ह्यात मोठा फटका बसला आहे. राजापूर, लांजा, देवरुख येथे महाविकास आघाडी म्हणून उद्धवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र आहेत.
- रत्नागिरीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने (शरद पवार) उद्धवसेनेची साथ सोडली आहे.
- चिपळुणात महाविकास आघाडीतील तीनही पक्ष नगराध्यक्ष निवडणूक लढवत आहेत. चिपळुणात नगरसेवकांच्या सर्व जागांवर उद्धवसेनेने उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे तेथेही आघाडी फसली आहे.