महावितरण व महापारेषण भरतीविरोधात महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 02:21 PM2024-01-07T14:21:06+5:302024-01-07T14:21:16+5:30

भरती प्रक्रियेच्या निवेदन जाहिरातीची होळी

Maharashtra Electricity Contract Workers Union Aggressive against Mahavitaran and Mahapareshan recruitment | महावितरण व महापारेषण भरतीविरोधात महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ आक्रमक

महावितरण व महापारेषण भरतीविरोधात महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ आक्रमक

मेहरून नाकाडे

रत्नागिरी : महावितरण व महापारेषण वीज कंपन्यांमध्ये १५ ते २० वर्ष अनुभवी वीज कंत्राटी कामगारांना आरक्षण व वयात सवलत न देताच प्रशासनाने भरती प्रक्रिया राबवण्यास सुरूवात केली आहे. याबाबत महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ आक्रमक झाला असून संघातर्फे भरती प्रक्रियेच्या निवेदन जाहिरातीची होळी कोकण परिमंडल कार्यालयासमोर करण्यात आली.

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने डिसेंबर २०१४ पासून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे वीज कामगार महासंघाचे अध्यक्ष अण्णा देसाई व कोथरुडच्या आमदार डॉ.मेधा कुलकर्णी यांच्या पाठपुराव्याने तत्कालीन ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दि.२२ एप्रिल २०१५ रोजी कंत्राटदार विरहित Nominal Muster roll ( NMR ) पद्धतीसाठी समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती. मनोज रानडे समितीच्या अहवालानुसार कंत्राटदार विरहित रोजगार व आरक्षण देण्याची शिफारस करण्यात आली होती. दि.४ जानेवारी २०२३ रोजी खाजगिकरणाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्रफडणवीस यांनी कंत्राटी कामगारांना वयात सवलत देण्याचे मान्य करत त्यांचा वेतनाचा पैसा त्यांना मिळेल असे घोषित केले. कंत्राटी कामगार संघाची बैठक घेऊ असे आश्वासन दिले होते परंतु अद्याप एकही मिटिंग न घेता भरतीचा घाट झालण्यात आला आहे.

निसर्गातील बदल, वादळे, कोरोनामध्ये जनतेला अखंडित व सुरळीत वीज पुरवठा करतांना शेकडो कंत्राटी कामगार मृत्युमुखी पडले, अनेक जण अपंग झाले. परंतु त्यांनाही सरकारने आर्थिक मदत केली नाही. महापारेषण कंपनीत १९०३ व महावितरणमध्ये ५८१३ जागा मिळून एकूण ७७१८ पदांची भरती काढून कार्यरत कंत्राटी कामगारांना बेरोजगार करण्याचा डाव सुरू आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी भारतीय मजदूर संघाशी संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांतर्फे भरती प्रक्रियेच्या निवेदन जाहिराती ची होळी कोकण परिमंडल कार्यालया समोर करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष जयेंद्र थुळ, उपाध्यक्ष प्रशांत साळवी, कार्याध्यक्ष सचिन देशमुख, सहकार्याध्यक्ष विलीन काष्टे, जिल्हा संघटक अजित शिंदे, सहसंघटक रोहन कुवळेकर, जिल्हा सचिव अमर गिरकर, जिल्हा महिला प्रतिनिधी गायत्री साळवी, जिल्हा कोषाध्यक्ष मंदार चव्हाण, राजापूर उपविभागप्रमुख घनश्याम लिंगायत, रत्नागिरी ग्रामीण उपविभागप्रमुख संदीप चौगुले उपस्थित होते.

Web Title: Maharashtra Electricity Contract Workers Union Aggressive against Mahavitaran and Mahapareshan recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.