चिपळुणात महायुतीसह महाविकास आघाडीही फुटली, उद्धवसेनेने सर्व जागांवर दाखल केले अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 16:13 IST2025-11-18T16:13:09+5:302025-11-18T16:13:41+5:30
दोन्ही राष्ट्रवादींच्या अडचणीत वाढ

चिपळुणात महायुतीसह महाविकास आघाडीही फुटली, उद्धवसेनेने सर्व जागांवर दाखल केले अर्ज
चिपळूण : नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरताना मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. ऐनवेळी विविध राजकीय पक्षाचे उमेदवार सरसावल्याने महायुतीसहमहाविकास आघाडीही फुटल्याचे उघड झाले. शेवटच्या क्षणी महायुतीमधील घटकपक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) पक्षाने ऐनवेळी नगरसेवक पदाचे उमेदवारी अर्ज भरले.
शिंदेसेना व भाजपने युती केली असून, शिंदेसेनेला नगराध्यक्षपदासह १६, तर भाजपला १२ जागा, असा फॉर्म्युला ठरला आहे. अशातच माजी आमदार रमेश कदम व आमदार भास्कर जाधव यांच्या एकीमुळे मजबूत झालेली महाविकास आघाडी उद्धवसेनेने ऐनवेळी सर्वच प्रभागांत अधिकृत उमेदवार दिल्याने अडचणीत आली आहे. या राजकीय घडामोडींमुळे सद्य:स्थितीत दोन्ही राष्ट्रवादी अडचणीत आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसला शिंदेसेना व भाजपने विश्वासात न घेता परस्पर नगराध्यक्ष पदाची उमेदवारी उमेश सकपाळ यांना दिली. त्यामुळे महायुतीतील राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी केली. या पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी मिलिंद कापडी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यासह प्रत्येक प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पुरस्कृत अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने महायुतीत फूट पडल्याचे स्पष्ट झाले.
एकीकडे महायुतीत राजकीय घडामोडी घडत असतानाच दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतही बिघाडी दिसून आली. माजी आमदार रमेश कदम व आमदार भास्कर जाधव यांनी एकत्र येत महाविकास आघाडीचा फॉर्म्युला निश्चित केला होता. परंतु, काँग्रेस नगराध्यक्ष पदावर ठाम राहिल्याने या दोघांच्याही अडचणीत वाढ झाली. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी उद्धवसेनेने पक्षाच्या आदेशानुसार शहरातील सर्वच जागांवर उमेदवार दिले. त्यामुळे आता माजी आमदार रमेश कदम व आमदार जाधव यांच्या दिलजमाईतून तयार झालेला फॉर्म्युलाही धोक्यात आला आहे.
आता उरली ‘युती अन् आघाडी’
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेवटपर्यंत महाविकास आघाडी व महायुतीच्या दृष्टीने चर्चा आणि बैठका सुरू होत्या. मात्र, आता महायुतीतील शिंदेसेना व भाजप अधिकृतपणे एकत्र आले आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) वेगळी पडली आहे. त्यातून महायुतीऐवजी केवळ ‘युती’ टिकली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील उद्धवसेना व काँग्रेस एकत्र आली आहे. महाआघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यापुढे अलिप्त राहिल्यास येथेही केवळ ‘आघाडी’ शिल्लक राहण्याची चिन्हे आहेत.
कोणी ‘एबी फॉर्म’ घेता का?
सर्वच राजकीय पक्षांनी शहरातील प्रत्येक प्रभागात उमेदवार देण्याची भूमिका ऐनवेळी घेतल्यामुळे शेवटच्या क्षणी उमेदवारांची शोधाशोध करावी लागली. शेवटी प्रत्येक प्रभागात संपर्क साधून कोणी इच्छुक उमेदवार आहे का, तसेच अपक्षांमधील नाराजांचाही शोध घेण्यात आला. त्यांना पक्षाकडून ‘एबी फॉर्म’ देण्यासाठी चढाओढ दिसून आली. एका राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षा प्रांत कार्यालयाच्या ठिकाणी पिशवीमधून एबी फॉर्म घेऊनच फिरत होत्या.