Ratnagiri: रुग्णालयातून दोन वर्षांच्या मुलाचे अपहरण; रेल्वेतून जात होता पळून, पण..
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 16:34 IST2025-10-01T16:33:06+5:302025-10-01T16:34:28+5:30
मुलाची आई रुग्णालयात उपचार घेत असताना ताे आजीकडे हाेता. त्याचवेळी संशयिताने मुलाचे अपहरण केले होते

Ratnagiri: रुग्णालयातून दोन वर्षांच्या मुलाचे अपहरण; रेल्वेतून जात होता पळून, पण..
रत्नागिरी : मुंबईतील रुग्णालयातून दोन वर्षांच्या मुलाला पळवून नेण्याचा प्रयत्न कोकण रेल्वेतील टीसीमुळे असफल ठरला. मुलाचे अपहरण करून त्याला पळवून नेणाऱ्या संशयिताला भुईवडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अमोल अनंत उदलकर (वय ४२, रा. इंदील, देवगड) असे या संशयिताचे नाव आहे. अपहरणाचा हा धक्कादायक प्रकार शनिवारी दादर-सावंतवाडी रेल्वेमध्ये घडला.
दादर-सावंतवाडी या गाडीमध्ये कोकण रेल्वेचे टीसी संदेश चव्हाण यांना संशयित व्यक्ती एका दाेन वर्षांच्या मुलाबरोबर दिसली. या व्यक्तीचे त्या मुलाशी असलेले वागणे चव्हाण आणि अन्य प्रवाशांना संशयास्पद वाटले. चव्हाण यांनी त्या व्यक्तीची चौकशी सुरू केली; पण त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे हा मुलगा नसल्याचा संशय अधिक बळावला.
त्यानंतर चव्हाण यांनी संशयित व्यक्तीला धरून ठेवले आणि तत्काळ चालत्या गाडीमधूनच नियंत्रण कक्ष, वाडी बंदर लोहमार्ग मुंबई आणि ठाणे लोहमार्ग पोलिस यांना माहिती दिली. ही माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक धुमाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने, सहायक पोलिस निरीक्षक ताजने आणि कर्तव्यावर कार्यरत असलेल्या पोलिसांनी संशयित व्यक्ती व त्याच्याकडील मुलाला ताब्यात घेतले.
अधिक चाैकशी केली असता संशयिताने आपले नाव अमाेल अनंत उदलकर, असे सांगितले. तसेच हा मुलगा मुंबईतील केईएम रुग्णालयातून पळवून आणल्याचे पाेलिस तपासात पुढे आले.
आजीकडे असताना अपहरण
अपहरण केलेल्या मुलाची आई रुग्णालयात उपचार घेत असताना ताे आजीकडे हाेता. त्याचवेळी संशयिताने त्या मुलाचे अपहरण केले होते. त्यानंतर ताे मुलाला घेऊन पळून जात हाेता.
संदेश चव्हाण यांचा गौरव
कोकण रेल्वेमध्ये आपली सेवा बजावताना दाखवलेल्या या सतर्कतेची दखल कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी घेतली आहे. त्यांनी संदेश चव्हाण यांचे विशेष कौतुक करत १५ हजारांचे विशेष पारितोषिक जाहीर केले आहे. तसेच कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट यांच्या हस्ते आणि कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संदेश चव्हाण यांचा गौरव करण्यात आला.