खंडणीची तक्रार नावे वगळून देण्याची खेड पोलिसांची अट, उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 12:20 IST2025-11-11T12:20:03+5:302025-11-11T12:20:16+5:30
पोलिस दबावाखाली येऊन काम करीत असल्याचा आरोप

खंडणीची तक्रार नावे वगळून देण्याची खेड पोलिसांची अट, उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांचा आरोप
चिपळूण : लोटे औद्योगिक वसाहतीत शिंदेसेनेचे काही पदाधिकारी व्यावसायिकांकडे खंडणी मागत असून, आमच्या कंपनीच्या सुपरवायझरकडेही दहा लाखांची खंडणी मागण्यात आल्याची तक्रार आम्ही पाेलिसांकडे केली. मात्र, यातील काही नावे वगळून तक्रार दिल्यास ती घेऊ अशी अट खेडपोलिसांनी ठेवली, असा आराेप उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.
लोटे एमआयडीसीत काम करायचे असेल, तर आम्हाला विश्वासात घ्या. नाहीतर तुमचे काम बंद पाडू, अशी धमकी देण्यात आली. याबाबत आम्ही खेडपोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र, त्यांनी ती घेतली नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची ऑनलाइन तक्रार आम्ही जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे, असे जाधव यांनी सांगितले.
ते म्हणाले की, सुवर्ण भास्कर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने लोटे एमआयडीसीतील विजय केमिकल प्रा. लि. कंपनीचे काम घेतले आहे. त्या ठिकाणी शिंदेसेनेचे काही पदाधिकारी आले आणि आमच्या सुपरवायझरला काम बंद करण्यास सांगितले. प्रथम आम्हाला विश्वासात घ्या, असेही या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. ही कंपनी उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांची आहे, असे सुपरवायझरने सांगितल्यानंतरही काम हवे तर दहा लाखांच्या खंडणीची मागणी केली.
यासंदर्भात आम्ही खेड पोलिस स्थानकात तक्रार देण्यास गेलाे असता यातील काही नाव वगळून तक्रार दिल्यास ती घेतो, अशी अट ठेवली. याचाच अर्थ पोलिस दबावाखाली येऊन काम करीत असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. याविषयी थेट जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दिल्याचेही जाधव यांनी सांगितले.