जगबुडी इशारा पातळीवर, वणंदमध्ये एकजण बुडाला; रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस मंडणगडात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 13:52 IST2025-05-27T13:52:01+5:302025-05-27T13:52:35+5:30
जिल्ह्यात आज ‘रेड अलर्ट’

जगबुडी इशारा पातळीवर, वणंदमध्ये एकजण बुडाला; रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस मंडणगडात
रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असल्याने खेडमधील जगबुडी नदीचे पात्र इशारा पातळीवरून ओसंडून वाहू लागले आहे. दापोली तालुक्यातील वणंद येथील नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने सकाळी कामावरून घरी परतत असलेले राजेंद्र सोनू कोळंबे (४९) हे कोंडीच्या पुलावरून वाहून गेले. तसेच मंगळवारी जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
पावसाने जिल्हाभरात रविवारी दुपारनंतर संततधार धरली होती. रात्रभर काेसळणाऱ्या पावसाचा साेमवारीही जाेर कायम हाेता. रविवारी सकाळपासून साेमवारी सकाळी १० वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ११० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षात झाली आहे. या पावसामुळे नद्यांचे पाणी वाढले असून, खेड तालुक्यातील जगबुडीचे पात्र इशारा पातळीवरून वाहू लागले आहे.
दापोली तालुक्यातील वणंद येथील नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेले राजेंद्र सोनू कोळंबे यांचा शोध सुरू आहे. तसेच वनाैशी तर्फ नाते येथे चंद्रकांत शंकर चव्हाण यांच्या मालकीचा जनावरांचा गाेठा काेसळून सहा जनावरांपैकी गायीचा मृत्यू झाला. अन्य पाच जनावरे जखमी झाली आहेत. रत्नागिरी तालुक्यातील आंबेशेत येथील घराची संरक्षक भिंत कोसळली आहे. त्याचबराेबर मंडणगडातील बाणकाेट, वाल्मिकीनगर भागात माेठ्या प्रमाणात पाणी साचले हाेते.
वाशिष्ठी नदीपात्रात अडकलेल्या तिघांची सुखरूप सुटका
मुसळधार पावसात मासेमारीसाठी गेलेले तिघे नदीपात्रात अडकल्याची घटना रविवारी रात्री चिपळूण तालुक्यातील खडपोली सोनारवाडी येथे घडली. या तिघांना चिपळूण रेस्क्यू टीमने चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूपपणे बाहेर काढले. दैव बलवत्तर म्हणून या तिघांचेही प्राण वाचविण्यात यश आले.