आयटी इंजिनिअरची गळफास घेऊन जीवन संपविले, चिपळुणातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 16:02 IST2025-12-26T16:02:31+5:302025-12-26T16:02:50+5:30
पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला

आयटी इंजिनिअरची गळफास घेऊन जीवन संपविले, चिपळुणातील घटना
चिपळूण : शहरातील पागमळा भागातील एकता अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहणाऱ्या एका आयटी अभियंत्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीला आली. आशिष किरण शेडगे (वय ४०, मूळ रा. आकुर्डी, पुणे) असे त्यांचे नाव आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकलेले नाही.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. आशिष शेडगे हे आयटी अभियंता होते. पुणे येथील एका कंपनीमध्ये ते काम करत होते. तर पत्नी चिपळूणमध्ये नोकरीला आहे. बुधवारी रात्री ते बिअर पिऊन घरी आले. घरी आल्यावर त्यांनी पुन्हा बिअर घेतली. रात्री पत्नी व मुलगा जेवण करून झोपले. त्यानंतर आशिष शेडगे यांनी गळफास घेतला.
हा प्रकार पत्नीच्या लक्षात येताच तिने गळफासाची दोरी कापून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्नीचे प्रयत्न निष्फळ ठरले आणि शेडगे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी चिपळूण पाेलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.