रत्नागिरीत ३० हजार कोटींचे प्रकल्प, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती; टेस्ला कोकणात यावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 15:49 IST2025-07-22T15:49:32+5:302025-07-22T15:49:57+5:30

बारसू, नाणार येथे अन्य प्रकल्प आल्यास स्वागत करण्याची भूमिका तेथील लोकांनी घेतली आहे

Investment of Rs 30 thousand crores in Ratnagiri Industry Minister, Guardian Minister Uday Samant gave information | रत्नागिरीत ३० हजार कोटींचे प्रकल्प, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती; टेस्ला कोकणात यावी

रत्नागिरीत ३० हजार कोटींचे प्रकल्प, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती; टेस्ला कोकणात यावी

रत्नागिरी : मायक्रो चीप तयार करणारा कारखाना, शस्त्रास्त्रांचा कारखाना आणि ड्रोन तयार करणारा कारखाना अशा उद्योगांमुळे रत्नागिरी तालुक्यात ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होत असल्याची माहिती उद्योगमंत्री तथा पालकमंत्रीउदय सामंत यांनी दिली. बारसू, नाणार येथे अन्य प्रकल्प आल्यास स्वागत करण्याची भूमिका तेथील लोकांनी घेतली आहे. त्यामुळे तेथेही चांगला प्रकल्प आणण्याचे प्रयत्न आहेत, असेही ते म्हणाले.

रत्नागिरीत दाेन प्रकल्प लवकरच सुरू होणार आहेत. आता ड्रोन तसेच सोलरमधील सेल तयार करणाऱ्या आरआरपी कंपनीने २०० एक जागेची मागणी केली आहे. त्यामुळे तो प्रकल्पही लवकरच रत्नागिरीत येईल, असे ते म्हणाले. या तीन प्रकल्पांमुळे काही काळातच रत्नागिरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कर्नाटकमध्ये शहाजी राजे यांचे स्मारक आहे. आपण लवकरच तेथे भेट देणार आहोत. त्याची डागडुजी करावी अन्यथा डागडुजी करण्यासाठी ते महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात द्यावे, अशी विनंती आपण कर्नाटक सरकारला करणार असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचे ११ किल्ले या यादीमध्ये समाविष्ट झाले आहेत. यावरूनच त्यांच्या कर्तृत्वाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जात असल्याचे लक्षात येतो. त्यामुळे आपणही छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित स्मारकांच्या नूतनीकरणावर भर दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

टेस्लाचा एखादा प्रकल्प कोकणात यावा

टेस्ला कंपनीचा एखादा प्रकल्प कोकणातही व्हावा, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

विनय नातू कोण आहेत?

भाजपचे माजी आमदार विनय नातू यांनी जिल्हा नियोजनच्या निधी वाटपावरून टीका केली आहे. त्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना मंत्री सामंत यांनी विनय नातू यांना मी काय उत्तर देणार? कोण आहेत ते, असा प्रतिप्रश्न केला. ते आमदारही नाहीत आणि पदाधिकारीही नाहीत. मित्रपक्षाचे असतील तर भेटतील. पण मला उत्तर द्यावेसे वाटत नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

Web Title: Investment of Rs 30 thousand crores in Ratnagiri Industry Minister, Guardian Minister Uday Samant gave information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.