रत्नागिरीत पावसाचा जोर; ‘जगबुडी’, ‘कोदवली’ इशारा पातळीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 15:50 IST2025-07-04T15:49:58+5:302025-07-04T15:50:16+5:30
सर्वाधिक पाऊस राजापूर, लांजा तालुक्यात

रत्नागिरीत पावसाचा जोर; ‘जगबुडी’, ‘कोदवली’ इशारा पातळीवर
रत्नागिरी : पावसाचा जोर बुधवारी रात्रीपासून वाढला असला तरी अजूनही त्यात सातत्य नाही. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पावसाच्या सरी पडत असल्या तरी गुरुवारी दुपारी खेडमधील ‘जगबुडी’ आणि राजापुरातील ‘काेदवली’ नद्यांची पातळी इशारा पातळीवर पाेहाेचली हाेती.
बुधवारी सायंकाळपासून पावसाचा जाेर वाढला आहे. जोरदार वाऱ्यासह रात्रभर पाऊस पडत होता. गुरुवारी सकाळी काही विश्रांती घेतलेल्या पावसाच्या अधूनमधून सरी काेसळत हाेत्या. सरींचा जोर वाढल्याने वातावरणात काहीसा गारवा आला हाेता.
जुलै महिना सुरू झाला तरीही म्हणावा तसा पाऊस अजूनही सुरू झालेला नाही. आतापर्यंत २७ टक्के पाऊस पडला आहे. बुधवारी रात्री जोरदार पडलेल्या पावसामुळे गुरुवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण ७०.२० मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद येथील जिल्हा नियंत्रण कक्षाकडे करण्यात आली आहे. सर्वाधिक पाऊस राजापूर आणि लांजा तालुक्यात १०० मिलिमीटरपेक्षा अधिक नोंदविण्यात आला आहे.
दरम्यान, गुरुवारी दुपारी जगबुडी नदीची पातळी ५.४० मिलिमीटर, तर काेदवली नदीची पाणीपातळी ५.७० मीटरपर्यंत पाेहाेचली हाेती. त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.