रत्नागिरी जिल्ह्यात पहिला ग्रोयान्स बंधारा आंजर्ले समुद्रात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 01:51 PM2024-04-01T13:51:30+5:302024-04-01T13:51:56+5:30

मुंबईच्या नरिमन पॉइंटच्या धर्तीवर ग्राेयान्स बंधारा बांधण्याचे काम, ७० कोटी रुपयांचा निधी मंजूर

First Groyans Dam in Ratnagiri District in Anjarle Sea | रत्नागिरी जिल्ह्यात पहिला ग्रोयान्स बंधारा आंजर्ले समुद्रात

रत्नागिरी जिल्ह्यात पहिला ग्रोयान्स बंधारा आंजर्ले समुद्रात

शिवाजी गोरे

दापोली : मुंबईच्या नरिमन पॉइंटच्या धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्यातील पहिला ग्राेयान्स बंधारा आंजर्ले (ता. दापाेली) समुद्रात बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मेरीटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून जागेची पाहणीही करण्यात आली आहे. या बंधाऱ्याचा फायदा खाडीतील मासेमारी बोटींना होणार असून, आंजर्लेतील पर्यटनालाही त्याचा मोठा फायदा होणार आहे. हे काम दोन ते तीन महिन्यांत पूर्ण होईल, असे मुंबईतील मेरिटाइम बाेर्डाचे मुख्य कार्यकारी अभियंता आर. एम. गोसावी यांनी सांगितले.

ग्रोयान्स बंधाऱ्यासाठी ७० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, समुद्रात ७०० मीटर लांब हा बंधारा बांधण्यात येणार आहे. समुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटी खाडीत लावल्या जातात. मात्र, खाडी व समुद्राच्या मुखाशी गाळ साठल्याने अनेक वेळा समुद्राच्या मुखाशी बोटी भरकटून बोटीला जलसमाधी मिळते. मात्र, या बंधाऱ्यामुळे खाडीतील पाणीपातळीत वाढ होणार आहे. तसेच खाडीतील गाळ काढला जाणार असल्याने बोटींना ये-जा करणे सोयीचे होणार आहे. त्यामुळे दुर्घटना टळणार आहे.

या बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंना बोटी लावण्यासाठी धक्का बांधला जाणार आहे. त्यामुळे बाेटी नांगरून ठेवणे साेयीचे हाेणार आहे. तसेच बंधाऱ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर बंधाऱ्यावर काँक्रिटीकरण करून सुशोभीकरण केले जाणार आहे. त्यामुळे थेट समुद्राच्या पाण्यात जाऊन पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे.

आंजर्ले समुद्रातील बंधाऱ्याचे काम वेळेत पूर्ण केले जाणार आहे. मच्छिमार बांधव व स्थानिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची काळजी हा बंधारा बांधताना घेतली जाणार आहे. - हनुमंत जाधव, ठेकेदार
 

ज्या ठिकाणी ग्राेयांस बंधारा हाेणार आहे, त्या ठिकाणाहून निसर्गाचे मनमाेहक दृश्य नजरेस पडते. खाडीचा भाग, अडखळ व पाजपंढरी ही गावे या ठिकाणाहून दिसतात. या बंधाऱ्यामुळे आंजर्लेतील पर्यटनाच्या वाढीला मदत हाेणार आहे. - संदेश देवकर, माजी सरपंच, आंजर्ले

Web Title: First Groyans Dam in Ratnagiri District in Anjarle Sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.