रत्नागिरीत जीवन प्राधिकरणाच्या गोदामाला आग, आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात धुराचे लोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 17:23 IST2025-12-01T17:23:02+5:302025-12-01T17:23:19+5:30
गोदामामध्ये ठेवण्यात आलेले एचडीपी पाइप जळून खाक

रत्नागिरीत जीवन प्राधिकरणाच्या गोदामाला आग, आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात धुराचे लोट
रत्नागिरी : शहरातील नाचणे येथील हवामान केंद्रासमोर असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या गोदामाला रविवारी सकाळी भीषण आग लागली. या आगीत गोदामामध्ये ठेवण्यात आलेले एचडीपी पाइप जळून खाक झाले असून, ९ लाख ५० हजारांचे नुकसान झाले आहे. या आगीची रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.
रविवारची सुट्टी असल्याने नागरिक घरात होते, गारठा असल्याने शहरातील रस्त्यावरही वर्दळ कमी होती. सकाळी नाचणे परिसरातील हवामान केंद्रासमोरील मोकळ्या जागेत असलेल्या जीवन प्राधिकरणाच्या गोदाम परिसरात धुराचे लोट दिसताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गोदामाच्या बाहेरील बाजूस असलेल्या वाळलेल्या गवताला सुरुवातीला आग लागली होती. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने ही आग वेगाने पसरत गोदामाच्या आतपर्यंत पोहोचली.
या गोदामात पाणीपुरवठा योजनांसाठी वापरण्यात येणारे मोठे एचडीपी पाइप साठवून ठेवण्यात आले होते. हे पाइप ज्वलनशील असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले, त्यामुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. आगीमध्ये पाइप जळल्यामुळे ९ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी नगर परिषदेचा अग्निशमन बंब तसेच एमआयडीसीचा अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तासाभरात आग आटाेक्यात आणण्यात त्यांना यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.