Ratnagiri: खेर्डीतील थ्री एम पेपर मिल कंपनीत आग, आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 15:34 IST2025-11-25T15:33:50+5:302025-11-25T15:34:18+5:30
नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे धोका टळला

Ratnagiri: खेर्डीतील थ्री एम पेपर मिल कंपनीत आग, आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट
चिपळूण : तालुक्यातील खेर्डी एमआयडीसी परिसरातील थ्री एम पेपर मिल कंपनीला सोमवारी दुपारी २ वाजता अचानक भीषण आग लागून परिसरात एकच गोंधळ उडाला. दुपारी अचानक उठलेल्या धुराच्या लोटानंतर अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. कंपनीत मोठ्या प्रमाणात कागदाचा साठा असल्याने ज्वाळांनी क्षणार्धातच वेग घेतला आणि आगीचे प्रमाण झपाट्याने वाढले. मात्र, नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे धोका टळला.
आग लागल्याची माहिती मिळताच कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना तत्काळ सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले. परिसरात प्रचंड धूर पसरल्याने स्थानिकांमध्येही चिंता व्यक्त करण्यात आली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी चिपळूण नगर परिषदेच्या अग्निशमन दलाची गाडी तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. अर्ध्या तासांहून अधिक वेळ ज्वाळा भडकलेल्या स्थितीत आहेत.
आग आटोक्यात आणण्यासाठी पाणी फवारणी आणि इतर उपकरणांच्या सहाय्याने प्रयत्न सुरू आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून प्राथमिक अंदाजानुसार, विद्युत बिघाड किंवा मशिनरी ओव्हरहिट झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.