Ratnagiri: चिपळुणात स्मशानभूमीत नातेवाइकांमध्ये हाणामारी, चौघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 16:55 IST2025-12-04T16:54:22+5:302025-12-04T16:55:48+5:30
नातेवाईक अंत्यदर्शनासाठी पाचच मिनिटांत येत आहेत, थोडा वेळ थांबलात तर बरं होईल अशी विनवणी करणाऱ्या तरुणाला स्मशानभूमीत मारहाण

संग्रहित छाया
चिपळूण (जि. रत्नागिरी) : आपले नातेवाईक अंत्यदर्शनासाठी पाचच मिनिटांत येत आहेत, थोडा वेळ थांबलात तर बरं होईल, अशी विनवणी करणाऱ्या तरुणाला भर स्मशानभूमीत चौघांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील पिंपळी येथे मंगळवारी सकाळी ११ वाजता घडला. यामध्ये फिर्यादी प्रशांत पोपट चव्हाण (३३, सध्या रा. आकले, चिपळूण, मूळ रा. कळकवणे, दादर, चिपळूण) हा जखमी झाला आहे.
या मारहाणप्रकरणी किरण बाळू जाधव (सध्या रा. पिंपळी, मूळ रा. पाटण, सातारा), मगट व्यंकट जाधव, अविनाश मगट जाधव, सौरभ सुनील जाधव (सर्व रा. तळदेव, महाबळेश्वर, सातारा), असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
प्रशांत चव्हाण हे त्यांची सख्खी मामी कविता बाळू जाधव यांच्या अंत्यविधीकरिता पिंपळी खुर्द येथील स्मशानभूमीत गेले होते. तेथे त्यांचे इतर नातेवाईक जमलेले होते. आपले आई-वडील व इतर नातेवाईक थोड्याच अंतरावर असून, ते अंत्यविधीकरिता येत आहेत, थोडा वेळ थांबा, त्यांना पण दर्शन घेऊ द्या, असे आपण जमलेल्या नातेवाइकांना सांगितले.
काही नातेवाइकांनी थांबायचे नाही, अग्नी द्या, असे सांगितले. त्याला इतर नातेवाइकांनी दुजोरा दिला. तेथे जमलेल्यांपैकी किरण जाधव याने तेथेच असलेला दगड आपल्या डोक्यात मारला, तसेच मगट जाधव, अविनाश जाधव, सौरभ जाधव यांनीही आपल्याला मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केली, असे प्रशांत चव्हाण यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.