Eight injured in Paliat bus crash, loss of buses | पालीत बस धडकेत आठ जखमी, बसचेही नुकसान
पालीत बस धडकेत आठ जखमी, बसचेही नुकसान

ठळक मुद्देपालीत बस धडकेत आठ जखमी, बसचेही नुकसान दोन थांबलेल्या बसेसना तिसऱ्या बसची धडक

पाली : मुंबई - गोवा महामार्गावर मंगळवारी सायंकाळी पाली बाजारपेठ देवतळे फाटा बसथांब्यानजीक दोन एस. टी. बसमधून प्रवासी उतरत असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या तिसऱ्या बसने या दोन्ही बसना जोरदार धडक दिल्याने झालेल्या तिहेरी अपघातामध्ये आठ प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातात एस. टी. बसेसचेही नुकसान झाले आहे.

मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास पाली बाजारपेठ देवतळे फाटा या मुंबई-गोवा महामार्गावरील बसथांब्यावर रत्नागिरी-लांजा ही एस. टी. बस प्रवासी उतरवत असतानाच पाठीमागून आलेल्या दुसऱ्या लांजा आगाराच्या रत्नागिरी - लांजा या बसचालकानेही आपल्या बसमधील प्रवाशांना उतरण्यासाठी पुढील बसच्या मागेच आपली बस थांबवली होती.

त्याचवेळी मागून आलेल्या रत्नागिरी - राजापूर या तिसऱ्या गाडीच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्याने पुढील बसला जोरदार धडक दिल्याने थांबलेली दुसरी बस तिच्यापुढील पहिल्या बसवर मागून आदळून झालेल्या अपघातात आठ प्रवासी जखमी झाले आहेत.

राजापूर आगाराच्या रत्नागिरी-राजापूर या बसवर शिवाजी लक्ष्मण हेटकळे यालाच चालक-वाहक म्हणून नेमण्यात आले होते. परंतु, त्याने त्याच्याच डेपोत कामाला असणाऱ्या व याच बसमधून प्रवास करणाऱ्या जितेंद्र झावरे याने बस चालविण्यास मागितल्याने चरवेली फाटा येथे बस चालवायला दिली. पाली येथे बस आल्यावर झावरे याचे बसवरील नियंत्रण सुटल्याने पुढे रस्त्यालगत थांबलेल्या बसला त्याने मागून जोराची धडक दिली.

या अपघाताची खबर एस. टी. चालक सादीक रफीक सय्यद (लांजा आगार) याने पाली पोलीस दूरक्षेत्रात दिली असून, अधिक तपास पाली पोलीस दूरक्षेत्राच्या महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल वैष्णवी यादव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव करत आहेत. या अपघातानंतर एस. टी.च्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली.

पालीत उपचार

अपघातात संदीप रसाळ (पाली), गोपाळ ताम्हणकर (कशेळी), प्रवीण वारिशे (लांजा), जितेंद्र धाकट (राजापूर), ओंकार काळोखे (लांजा), प्रदीप तांदळे, ताराचंद्र कामटे, उदय सोलगावकर (सर्व लांजा) हे जखमी झाले. सर्व जखमींवर पाली ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.


Web Title: Eight injured in Paliat bus crash, loss of buses
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.