Ratnagiri Crime: भक्तीशी अश्लील बोलला, दुर्वासने काढला वीरचा काटा; पोलिस अधीक्षकांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 14:04 IST2025-09-04T14:01:53+5:302025-09-04T14:04:23+5:30
तिहेरी हत्याकांडप्रकरणी अधिक धागेदोरे लवकरच हाती

Ratnagiri Crime: भक्तीशी अश्लील बोलला, दुर्वासने काढला वीरचा काटा; पोलिस अधीक्षकांनी दिली माहिती
रत्नागिरी : सीताराम वीर हा माझ्याशी फोनवरून अश्लील संभाषण करीत असल्याचे प्रेयसी भक्ती हिनेच मला सांगितले होते. यामुळे आलेल्या रागातून आपण वीर याचा काटा काढला, असे दुर्वास दर्शन पाटील याने पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे या तिहेरी हत्याकांडातून आता लवकरच अधिक धागेदोरे हाती येतील, असे पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
लग्नात बाधा नको, म्हणून दुर्वास याने वायरने गळा आवळून भक्ती मयेकर हिचा खून केला. भक्ती १६ ऑगस्टपासून बेपत्ता असल्याने तिच्या भावाने रत्नागिरी पोलिस ठाण्यात बेपत्ताची तक्रार दिली होती. त्यानुसार शहर पोलिस तपास करीत असताना तिची हत्या दुर्वास याने केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला तसेच खुनासाठी मदत करणारे त्याचे साथीदार विश्वास पवार, नीलेश भिंगार्डे यांना अटक करण्यात आली. पोलिस चौकशीत दुर्वास याने सीताराम वीर याला बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची कबुली दिली तसेच वीर याच्या खुनाची माहिती राकेश जंगम याला होती.
ती तो पोलिसांना देईल, अशी भीती वाटत असल्याने त्यालाही बारमध्ये ठार मारून त्याचे प्रेत आंबा घाटात दरीत टाकल्याचे दुर्वास याने कबूल केले. या तिहेरी हत्याकांडात आतापर्यंत दुर्वास पाटील, विश्वास पवार, सुशांत नरळकर, नीलेश भिंगार्डे असे चार आराेपी असल्याचे स्पष्ट झाले आहे. राकेश याचा मृतदेह आंबा घाटातील दरीत शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र, या घटनेला एक वर्ष होऊन गेले आहे. तसेच घनदाट जंगलामुळे त्याच्या शरीराचे अवशेष मिळण्यात अपयश आल्याचेही अधीक्षक बगाटे यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक बाबूराव महामुनी तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरेही उपस्थित होते.
दोषींवर कारवाई करणार
एक वर्षापूर्वी हत्या केलेल्या राकेश जंगम यांच्या आईने आपला मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार वारंवार जयगड पोलिस ठाण्यातील निरीक्षक पाटील यांच्याकडे केली होती. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केले. राकेश याच्या खुनाला पोलिस निरीक्षक पाटील हेही जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी राकेशची आई वंदना जंगम यांनी केली आहे. याविषयी पोलिस अधीक्षक बगाटे म्हणाले की, यात जे जे दोषी असतील, त्यांच्यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल.
भक्ती प्रेग्नंट नव्हती?
भक्तीच्या खुनाविषयी तपासात अनेक बाबी पुढे येत आहेत. पोलिसांच्या अहवालात भक्ती प्रेग्नंट असल्याचे नमूद करण्यात आले असले तरी पोस्टमार्टेममध्ये ती प्रेग्नंट नसल्याचे आढळून आल्याची बाबही पुढे येत आहे.