ठेकेदाराअभावी रखडल्या कृषिपंपांच्या जोडण्या

By Admin | Updated: June 29, 2016 23:58 IST2016-06-29T21:58:31+5:302016-06-29T23:58:07+5:30

महावितरण कंपनी : डोंगराळ भागामुळे उदासीनता

Due to the contractor, due diligent agricultural connections | ठेकेदाराअभावी रखडल्या कृषिपंपांच्या जोडण्या

ठेकेदाराअभावी रखडल्या कृषिपंपांच्या जोडण्या

रत्नागिरी : कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना वीजजोडण्या दिल्या जातात. भौगोलिकदृष्ट्या रत्नागिरी जिल्हा डोंगराळ भागात वसलेला आहे. वीजजोडण्यांसाठी महावितरण ठेकेदारांची नियुक्ती करते. डोंगराळ भागातील कामासाठी ठेकेदार तयार होत नाहीत. त्यामुळे कृषी विभागाच्या १ हजार १२४ जोडण्या रखडल्या आहेत.
जिल्ह्यातील अनेक बेकार युवक रोजगार न मिळाल्याने सामूहिक शेती करीत आहेत. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली विविध भाजीपाला, फळभाज्यांचे उत्पादन घेण्यात येत आहे. पावसाळी शेती बरोबर बारमाही शेतीसाठी प्रयत्नशील असलेल्या शेतकऱ्यांकडून कृषिपंपांच्या जोडण्या घेण्यात येतात. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत विजेचे खांब टाकून वीज जोडण्या दिल्या जातात. डोंगराळ भागातील कामासाठी ठेकेदार तयार होत नाहीत. शिवाय त्यासाठी दर अधिक मागण्यात येऊनसुध्दा दर देण्यात येत नाहीत. रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षी ५०० वीज जोडण्यांचे उद्दिष्ट असताना ठेकेदारांअभावी जोडण्यांची उद्दिष्ट पूर्ती होण्यात अडथळा येत आहे. पैसे भरूनही जोडण्या न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील तरूणवर्ग आता सजग झाला आहे. नोकरीच्या मागे न लागता शेतीकडे वळण्याची मानसिकता तयार होत आहे. त्यामुळे कृषिपंपाच्या जोडण्या प्राधान्याने देणे गरजेचे आहे. ११२४ वीज जोडण्यांपैकी ६८० कृषिपंप आरक्षित कोट्यातील आहेत, तर ४४४ खुल्या गटातील आहेत. वर्षभरात केवळ ३१४ जोडण्या देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी विभागात २४२, चिपळूण विभागात १०४, खेड विभागात ९८ कृषिपंपाची यादी प्रलंबित आहेत.
पावसाळा सुरू झाल्यामुळे सध्या नवीन कनेक्शन देण्याचे काम बंद आहे. पावसाळ्यात खोदाईसाठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर काम सुरू होईल. परंतु येत्या वर्षभरात ११२४ कृषिपंप शंभर टक्के देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. प्रलंबित यादी वर्षभरात संपवण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Due to the contractor, due diligent agricultural connections