गुहागर : दारूच्या नशेत कर्मचाऱ्याने रुग्णालयात गोंधळ घालून अंगावर सॅनिटायझरची बाटली ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. हा प्रकार शनिवारी दुपारी गुहागर ग्रामीण रुग्णालयात घडला. रुग्णालयातील अन्य कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत त्याला राेखल्याने पुढील अनर्थ टळला.याप्रकरणी रवींद्र भागाेजी जाधव (वय ४०, रा. ग्रामीण रुग्णालय क्वार्टर, गुहागर) या कर्मचाऱ्याविराेधात गुहागर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविराेधात डाॅ. जयपाल रघुनंदन ढाले (३०) यांनी फिर्याद दिली आहे. डाॅ. जयपाल ढाले हे शनिवारी ग्रामीण रुग्णालयात कर्तव्यावर असताना दुपारी २:३० वाजण्याच्या दरम्यान रुग्णालयातील कर्मचारी रवींद्र जाधव दारू पिऊन आला. त्याने दारूच्या नशेत डाॅ. ढाले यांच्यावर आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तसेच गैरशिस्तीचे वर्तन करून रुग्णालयात गाेंधळ घातला.
त्याचबराेबर त्याने कार्यालयातील सॅनिटायझरची बाटली अंगावर ओतून ‘मी इथेच जीव देऊन तुमची सर्वांची नावे लिहीन,’ अशी धमकी देत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, रुग्णालयातील अन्य कर्मचाऱ्यांनी त्याला वेळीच राेखल्याने पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी पाेलिसांनी रवींद्र जाधव याच्यावर गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पाेलिस करीत आहेत.