Ratnagiri: टँकर कलंडतोय म्हणून उडी मारली अन् टँकर अंगावर पडला; चालक जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 14:05 IST2025-11-25T14:05:23+5:302025-11-25T14:05:41+5:30
चिपळूण : तालुक्यातील पिंपळी येथील कॅनॉल पुलावर उलटलेल्या टँकरखाली सापडून चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री १०:३० वाजण्याच्या ...

Ratnagiri: टँकर कलंडतोय म्हणून उडी मारली अन् टँकर अंगावर पडला; चालक जागीच ठार
चिपळूण : तालुक्यातील पिंपळी येथील कॅनॉल पुलावर उलटलेल्या टँकरखाली सापडून चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास घडली. भरधाव वेगातील हा टँकर उलटत असताना त्यातून चालकाने बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यातच तो टँकरखाली सापडला असल्याचा अंदाज आहे. बबन महादेव ढगे (६२, सांगली) असे मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे.
कुंभार्ली घाटामार्गे हा रिकामा पाण्याचा टँकर चिपळूणच्या दिशेने येत होता. तो पिंपळी येथील कॅनॉल पुलावर आला तेव्हा चालकाचे टँकरवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे टँकर कलंडू लागला. हे लक्षात येताच बबन ढगे यांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत टँकर उजव्या बाजूला उलटला. या टँकरखाली ढगे सापडल्याने त्यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.
याच ठिकाणी काही महिन्यांपूर्वी थार गाडीने एका रिक्षाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाचजण जागीच ठार झाल्याची घटना घडली होती.
टँकर अपघातानंतर काही वेळ मार्गावर वाहतूक कोडी झाली होती. या घटनेची माहिती समजताच चिपळूण पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी वाहतूक पूर्ववत केली.