रत्नागिरी : भारताच्या जनगणना २०२७ या मोहिमेत रत्नागिरी जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. चिपळूण तालुक्यातील दळवटणे गाव संपूर्ण जिल्ह्यात स्वगणना प्रक्रिया १०० टक्के पूर्ण करणारे पहिले गाव ठरले आहे. प्रशासनाने दिलेल्या १५ मेपर्यंतच्या मुदतीपूर्वीच या गावाने नोंदणी पूर्ण केली आहे.
जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील घरयादी आणि घरगणनेसाठी १ ते १५ मे २०२६ हा काळ स्वगणना करण्यासाठी निश्चित करण्यात आला होता. या माेहिमेसाठी जिल्हाधिकारी मनूज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचे नियोजन करण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांनी दळवटणे गावाची या उपक्रमासाठी प्रायोगिक तत्त्वावर निवड केली होती.
२०११ च्या जनगणनेनुसार दळवटणे गावाची लोकसंख्या १,८७१ इतकी होती. मात्र, आता झालेल्या ताज्या स्वगणनेनुसार ही लोकसंख्या २,२६२ पर्यंत पोहोचली आहे. गावात एकूण ४२५ कुटुंबे असून, या सर्वांची नोंदणी यशस्वी झाली आहे. तहसीलदार प्रवीण लोकरे आणि मंडळ अधिकारी नारायण चौधरी यांनी याप्रक्रियेत सूक्ष्म नियोजन केले होते. गावातील सर्व ९ वाड्यांमध्ये प्रगणक आणि मदतनिसांच्या पथकाने युद्धपातळीवर काम केले.
दळवटणे गावाला जिल्ह्यात अग्रक्रमावर आणण्यासाठी प्रगणक वैशाली पेड्डेवाड, सचिन जाधव, प्रिया मोरे यांनी क्षेत्रीय काम पाहिले. त्यांना शीतल कराडकर, रोशनी जाधव, ऋतुजा इंगवले, मेघना नलावडे, सुप्रिया बोबले, अर्चना जाधव, सीमा गमरे, सुवर्णा जाधव आणि पोलिसपाटील अमित मोहिते यांची मदत मोलाची ठरली.
गाव ‘राेल माॅडेल’
दळवटणे गावाने दाखवलेली तत्परता ही डिजिटल साक्षरतेचे प्रतीक आहे. आगामी मुख्य जनगणनेसाठी हे गाव संपूर्ण जिल्ह्यासाठी ‘रोल मॉडेल’ ठरेल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.
नऊ वाड्यांमधील नोंदणी पूर्ण झालेली कुटुंबे
वाडीचे नाव - कुटुंब संख्या
नलावडेवाडी- १०१
बागवाडी- ६७
भुवडवाडी- ६४
गणेशवाडी- ५१
बौद्धवाडी- ४९
बडदेवाडी- ३५
राजवाडा- २२
शेट्येवाडी- १८
रामवाडी- १८
Web Summary : Ratnagiri district leads in Census 2027; Dalvatane village in Chiplun becomes first to achieve 100% self-enumeration. The village's population increased to 2,262, with 425 families registered.
Web Summary : रत्नागिरी जिला जनगणना 2027 में आगे; चिपलूण का दळवटणे गांव 100% स्व-गणना प्राप्त करने वाला पहला गांव बना। गांव की आबादी बढ़कर 2,262 हो गई, जिसमें 425 परिवारों का पंजीकरण हुआ।