Ratnagiri Crime: सिगारेट पेटविण्यास लायटर दिला नाही, चुलतभावाचा केला निर्घृण खून; परप्रांतीय कामगारास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 12:04 IST2025-07-17T12:03:30+5:302025-07-17T12:04:16+5:30
देवगड वरेरी येथील चिरेखाणीवरील घटना

Ratnagiri Crime: सिगारेट पेटविण्यास लायटर दिला नाही, चुलतभावाचा केला निर्घृण खून; परप्रांतीय कामगारास अटक
देवगड : सिगारेट पेटविण्यास लायटर दिला नाही. या क्षुल्लक कारणावरून एका परप्रांतीय कामगाराने आपल्या चुलतभावाच्या डोक्यात टॉमी मारून त्याचा निर्घृण खून केल्याची घटना देवगड तालुक्यातील वरेरी कुळये सडेवाडीनजीक एका चिरेखाणीवर घडली आहे.
कृष्णकुमार जुगराज यादव (वय २०, मूळ रा. मध्य प्रदेश, सध्या रा. वरेरी कुळये सडेवाडीनजीक चिरेखाण) असे मृत व्यक्तीचे नाव असून, आरोपी रितीक दिनेश यादव (२०, मूळ रा. मध्य प्रदेश, सध्या रा. वरेरी कुळये सडेवाडीनजीक चिरेखाण) याला देवगड पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बुधवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
वरेरी कुळये सडेवाडीनजीक शिवराम शांताराम जाधव यांच्या जागेत उमेश गंगाराम गवाणकर यांची चिरेखाण आहे. या चिरेखाणीवर आठ ते दहा परप्रांतीय कामगार काम करत आहेत. त्यात नात्याने चुलतभाऊ असलेले कृष्णकुमार यादव व रितीक यादव हे दोघेही होते. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास हे दोन्ही भाऊ चिरेखाणीवरील एका ट्रकमध्ये झोपण्यासाठी गेले होते. यावेळी रितीक याचा सिगारेट ओढण्याचा लायटर कृष्णकुमारजवळ होता.
रितीक याने तो मागितल्याने दोघांत वाद झाला. कृष्णकुमारने रितीक याच्या कानशिलात लगावली व तो ट्रकबाहेर आला. चिडलेला रितीक ट्रकमधील टॉमी घेऊन गेला आणि चिरेखाणीजवळ कृष्णकुमार याच्या डोक्यात टॉमीने जोरदार प्रहार केला. वार वर्मी लागल्याने कृष्णकुमार याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर टॉमी चिरेखाणीतील पाण्यात फेकून देत रितीकने तेथून काढता पाय घेतला.
दरम्यान, तळेबाजार येथे राहणारा चिरेखाणीचा मुकादम विजय अण्णापा शेंडगे हा बुधवारी सकाळी सहा वाजता नेहमीप्रमाणे तो चिरेखाणीवर गेला. तेथे कृष्णकुमार व रितीक हे न दिसल्याने त्यांनी इतर कामगारांसमवेत त्या दोघांचा चिरेखाण परिसरात शोध घेतला. यावेळी कृष्णकुमार हा चिरेखाणीत मृत अवस्थेत दिसला तर रितीकचा शोध घेतला तेव्हा तो तळेबाजार बाजारपेठेत दिसला.
मुकादम शेंडगे यांनी ही माहिती पोलिस पाटील मुकेश पारकर यांना फोनवरून दिली. पारकर यांनी देवगड पोलिस ठाण्यात कळविले. त्यानंतर देवगड पोलिस निरीक्षक भरत धुमाळ हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रितीक याला ताब्यात घेतले. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा केला.
घटनास्थळी तपासकार्यात पोलिस उपनिरीक्षक महेश देसाई, पोलिस हवालदार महेंद्र महाडिक, आशिष कदम, भाऊ नाटेकर, पोलिस कॉन्स्टेबल प्रसाद आचरेकर, दीपेश तांबे, रवींद्र महाले, राजेश पाटील यांनी काम पाहिले. यावेळी वरेरी सरपंच प्रिया गोलतकर, पोलिस पाटील मुकेश पारकर, चिरेखाण मालक उमेश गवाणकर उपस्थित होते.
खुनाचा गुन्हा दाखल
घटनेची माहिती मुकादम विजय अण्णापा शेंडगे यांनी देवगड पोलिस ठाण्यात दिली. रितीक यादव याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक भरत धुमाळ करत आहेत. अप्पर पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांच्यासह पोलिस उपविभागीय अधिकारी घनश्याम आढाव यांनीही घटनास्थळी भेट देऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली.