गद्दारांना असे गाडा की पुन्हा कोणी गद्दारी करु नये, उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना आवाहन

By मनोज मुळ्ये | Published: February 5, 2024 05:37 PM2024-02-05T17:37:36+5:302024-02-05T17:38:06+5:30

'त्याची' जाण मोदींना असायला हवी

Confiscate the deposit of traitors, Uddhav Thackeray appeal to Shiv Sainiks | गद्दारांना असे गाडा की पुन्हा कोणी गद्दारी करु नये, उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना आवाहन

गद्दारांना असे गाडा की पुन्हा कोणी गद्दारी करु नये, उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना आवाहन

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीत आपली रत्नागिरीची जागा कायम राहिलीच पाहिजे आणि त्यानंतरच्या निवडणुकीत गद्दारांना धडा शिकवायला हवाय. गद्दारांचे डिपॉझिट असे जप्त करा की पुन्हा कोणी रत्नागिरीमधून गद्दारीतील ‘ग’सुद्धा उच्चारणार नाही, असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

रत्नागिरीमध्ये आयोजित जनसंवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी, जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, तालुकाप्रमुख प्रदीप तथा बंड्या साळवी, माजी आमदार सुभाष बने, संजय चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी व्यासपीठावर होते.

आपण एका निष्ठावंताची पाठ थोपटायला आणि गद्दाराच्या पेकाटात लाथ घालायला आलो आहे, अशा शब्दात त्यांनी भाषणाची सुरुवात केली. उद्योग मंत्री म्हणतात की आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जातोय. पण हे शिवसेनेत आले २०१४ साली. ज्यावेळी बाळासाहेब होते, तेव्हा तुम्ही आमच्याशी लढत होतात. लाचारी करुन पक्षात आलात. मी मान्य करतो मी मंत्रीपदाचा शब्द दिला आणि मी तो पाळलाही. २०१४ च्या टर्ममध्ये मी त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले म्हाडाचे चेअरमन दिले.पण त्यांनी शब्द पाळला नाही. २०१९ साली त्यांना मंत्रिपद द्यायची गरज नव्हती. तरीही शब्द दिला होता म्हणून तेव्हाही मंत्रीपद दिले. पण मंत्रिपद घेतले आणि पळाले, अशी टीका त्यांनी केली.

ज्या खुर्चीत बसून बाळासाहेबांनी मोदी यांची खुर्ची वाचवली, त्या खुर्चीची किंमत आता केली जात आहे. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना जे काही घडले, त्यामुळे तेव्हाचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी नाराज होते. त्यावेळी बाळासाहेबांनी सांगितले होते की मोदी गया तो गुजरात गया. त्यांच्यामुळेच मोदी यांची खुर्ची वाचली. याची जाण मोदींना असायला हवी. तरीही हे सरकार या खुर्चीची किंमत करत आहे, असा आरोप त्यांनी केला.
सत्ता बदल होऊदे, बाळासाहेबांच्या आसनाची किंमत करणार्यांची आणि त्यांना आदेश देणार्यांची आपण किंमत करु, असेही ते म्हणाले. सत्तेचा दुरुपयोग कसा करायचा हे तुम्हीच आम्हाला शिकवताय. आम्ही तसे करणार नाही. पण आम्हाला विनाकारण ठळणार असाल तर तुम्हाला दया, माया दाखवता येणार नाही, असेही ते स्पष्ट शब्दात म्हणाले.

न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राममंदिर झाले आहे. पण त्याचे श्रेय भाजपावाले घेत आहेत. कोणत्या दिशेने हे महाराष्ट्र नेत आहेत? महाराष्ट्रला डाग लावत आहेत, असाही आरोप त्यांनी केला,

उद्योगमंत्र्यांचे नाव न घेता त्यांनी बरीच टीका केली. महाराष्ट्रात किती उद्योग आले, असा प्रश्न त्यांनी केला.
शिवसेनेचे हिंदुत्त्व चुली पेटवणारे आणि भाजपाचे हिंदुत्त्व धर्माच्या नावाखाली घरं पेटवणारे आहे. या दोन हिंदुत्त्वामधील फरक मुस्लिम समाजालाही कळला आहे. त्यामुळे ते आपल्यासोबत येत आहेत, असेही ते म्हणाले.

जेवायचाही हिशोब लावतील का?

राजन साळवी यांच्याकडे जेवायला जाताना शंका वाटत आहे. कदाचित त्या जेवणाचाही हिशोब लावण्यासाठी अधिकारी येतील, असा टोला त्यांनी हाणला.

भाजपा म्हणजे काय

भाजपा म्हणजे बाहेरची जनता पार्टी, भेकड जनता पार्टी, भाकड जनता पार्टी, भ्रष्टाचारी जनता पार्टी, बेडूक जनता पार्टी, भाड्याची जनता पार्टी अशी अनेक नावे आपण ठेवली आहेत. यांचे आमदार पोलीस स्थानकात गोळीबार करतात आणि त्याला हे रामराज्य म्हणतात, अशी टीकाही ठाकरे यांनी केली.

Web Title: Confiscate the deposit of traitors, Uddhav Thackeray appeal to Shiv Sainiks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.