चिरेखाणी सताड उघड्याच

By Admin | Updated: August 20, 2015 22:03 IST2015-08-20T22:03:15+5:302015-08-20T22:03:15+5:30

आदेश धाब्यावर : मालकांना ना चिंता, प्रशासनाला ना काळजी

Chirkkiyatadam open | चिरेखाणी सताड उघड्याच

चिरेखाणी सताड उघड्याच

राजेंद्र यादव -रत्नागिरीउत्खननाचे काम बंद झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश चिरेखाणी उघड्या असतात. संरक्षण कठडा न बांधताच संरक्षित उपाययोजनेच्या दृष्टीने त्या धोकादायक ठरत आहेत. यामुळे लोकांच्या जीवितास धोका पोहोचण्याची आणि अपघात घडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सध्या चिरेखाण व्यवसाय करणे प्रतिष्ठेचे मानले जात आहे. त्यामुळे बरेचजण चिरेखाण व्यवसायात गुंतले आहेत. जिल्ह्याचे महसूल खाते फक्त रॉयल्टी घेत आहे. त्यामुळे शासनाचा महसूल वाढत असला तरी तहसीलदारांनी आपल्या मंडल अधिकाऱ्यांना, तलाठ्यांना अथवा तत्सम गावकऱ्यांना आदेश देऊन चिरे खाणीच्या सभोवती संरक्षक कठडा घालून घेणे आवश्यक आहे. खाण मालकांचेही ते कर्तव्य आहे. परंतु जिल्ह्यात तसे कुठेही आढळून येत नाही.
पावसाळ्यात या खाणी पाण्याने तुडुंब भरलेल्या असतात. सुटीच्या दिवसात शेतकऱ्यांची मुले जनावरे चारण्यासाठी अथवा कुतूहलापोटी पोहण्यासाठी या खाणीतही खोल पाण्यामध्ये उड्या मारतात. खाणीमधील खोलीचा व पाण्याचा त्या लहान मुलांना अंदाज नसतो. खाणीच्या तळाशी चिकट मातीचा थर जमा झालेला असतो. त्यामुळे या पोहणाऱ्या मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू ओढवतो. अशा अनेक घटना यापूर्वी जिल्हाभरामध्ये घडलेल्या आहेत. वन्य प्राणी, पाळीव जनावरे यांचाही तोल जाऊन त्याच्या जीवावर बेतू शकते.हे लक्षात घेऊन तत्कालीन जिल्हाधिकारी राजीव जाधव यांनी या चिरेखाणींना कुंपण घालण्याचे आदेश काढले होते. ते आदेश चक्क धाब्यावर बसवण्यात आले आहेत.तहसीलदारांनी या उघड्या चिरेखाणी बंदिस्त करण्यासाठी संबंधितांना आदेश देणे गरजेचे आहे. ज्या उघड्या चिरेखाणी आहेत, त्यांना संरक्षित कठडे बांधून घेणे, हे तेथील तलाठी किंवा ग्रामपंचायतीचे कर्तव्य आहे. परंतु आतापर्यंत तसे झालेले नाही. प्रशासन नागरिकांच्या जिवाशी खेळत असून, अपघाताला आमंत्रण देत आहेत.

Web Title: Chirkkiyatadam open