चिपळूणच्या महाविकास आघाडीत बिघाडी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:22 IST2021-07-10T04:22:38+5:302021-07-10T04:22:38+5:30

चिपळूण : गेल्या काही दिवसांपासून येथील महाविकास आघाडीत वाढीव बिलांवरून खदखद सुरु आहे. त्यावर महाविकास आघाडीचा आजही अंतिम निर्णय ...

Chiplun's mega development front continues to fail | चिपळूणच्या महाविकास आघाडीत बिघाडी कायम

चिपळूणच्या महाविकास आघाडीत बिघाडी कायम

चिपळूण : गेल्या काही दिवसांपासून येथील महाविकास आघाडीत वाढीव बिलांवरून खदखद सुरु आहे. त्यावर महाविकास आघाडीचा आजही अंतिम निर्णय झालेला नाही. उलट त्यावरून आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच येत्या सभेत वाढीव बिलांचा मुद्दा चर्चेला येणार असल्याने महाविकास आघाडी कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

नगर परिषदेतील रस्ते व अन्य कामांची सुमारे ४ कोटी ७४ लाख रुपयांची एकूण बिले आहेत. त्याव्यतिरिक्त उक्ताड पार्किंग झोन विकसित करण्यासाठी सुमारे २४ लाखांचे वाढीव काम केले असून, त्याला मंजुरी घेतली असली, तरी निविदा प्रक्रिया राबविलेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचा या वाढीव बिलांना विरोध आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी विकासकामांची वाढीव बिले काढावीत, यासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही गटनेत्यांनी मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिले होते. मात्र, महाविकास आघाडीतील अन्य नगरसेवक व नगरसेविकांनी आक्षेप घेतल्यानंतर काँग्रेसचे गटनेते सुधीर शिंदे व राष्ट्रवादीचे गटनेते बिलाल पालकर यांनी आपले पत्र तत्काळ मागे घेतले. शिवसेना गटनेते उमेश सकपाळ यांनी अद्यापही पत्र मागे घेतलेले नाही. त्यामुळे शिवसेनेच्या या भूमिकेविषयी महाविकास आघाडीच्या अन्य नगरसेवकांमध्ये धुसफूस सुरु आहे.

याविषयी खासदार विनायक राऊत यांनीही शिवसेना नगरसेवकांची बैठक घेतली होती. या बैठकीत ठेकेदारांची वाढीव बिले काढावीत, यासाठी पत्र दिल्याने गटनेते सकपाळ यांना झापले, अशी चर्चा होती. परंतु, असा कोणताही प्रकार घडलेला नाही, असा खुलासा सकपाळ यांनी केला. एवढेच नव्हे तर सकपाळ यांनी मी कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार पालिकेशी केलेला नाही. हे केवळ मला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे, मी केवळ मागील सभेत झालेल्या ठरावाला अविनाश केळस्कर हे सूचक होते, त्यांनी आपण या ठरावाचे सूचक राहणार नाही, असे कळविल्याने त्या जागी माझे नाव सूचक म्हणून घ्यावे, एवढेच पत्र दिल्याचा स्पष्ट खुलासा केला आहे. यावर नगरसेवक राजेश केळस्कर यांनी खोट्या ठरावाला सकपाळ यांनी सूचक म्हणून नाव दिलेच का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे येत्या सभेत इतिवृत्त वाचनात याविषयीचा ठराव अंतिम मंजुरीसाठी ठेवला जाणार असल्याने त्यावेळी शिवसेनेसह महाविकास आघाडी कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Chiplun's mega development front continues to fail