मुख्यमंत्री प्रकल्प समर्थकांना लवकरच भेटतील, पालकमंत्री अनिल परब यांचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 21:23 IST2021-01-26T21:23:01+5:302021-01-26T21:23:55+5:30
Uddhav Thackeray : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे हे सर्वाचीच बाजू ऐकून घेतील. नाणार रिफायनरी समर्थकांनाही लवकच ते भेटी देतील. भेटीची प्रक्रिया सुरु आहे. त्यांना लवकरच कळवले जाईल

मुख्यमंत्री प्रकल्प समर्थकांना लवकरच भेटतील, पालकमंत्री अनिल परब यांचे आश्वासन
राजापूर - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे हे सर्वाचीच बाजू ऐकून घेतील. नाणार रिफायनरी समर्थकांनाही लवकच ते भेटी देतील. भेटीची प्रक्रिया सुरु आहे. त्यांना लवकरच कळवले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे परिवहनमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यानी आपल्या राजापूर भेटी दरम्यान केले. मंगळवारी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फेडरेशन अॉफ असोसिएशन्स फॉर रत्नागिरी डेव्हलपमेंट (फार्ड)च्या वतीने मुख्यमंत्र्याची भेट मिळावी, म्हणून उपोषण करण्यात आले. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
फडणवीस सरकारच्या काळात या प्रकल्पाला विरोध करत शिवसेनेने आम्ही जनतेच्या बाजूने म्हणत या रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाची जमीन अधिग्रहणाची अधिसू्चना रद्द करून घेतली होती. त्यानंतर राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले आहे. सद्यस्थितीत नाणार रिफायनरी प्रकल्पाला असणारा विरोध मोठ्या प्रमाणावर कमी झाला असून समर्थन वाढते आहे. आम्हाला नाणार प्रकल्प हवा आहे, मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यानी आमची बाजू ऐकून घ्यावी, अशी मागणी प्रकल्प समर्थकांनी केली आहे. आमची बाजू मांडण्यासाठी आम्हाला वेळ द्यावा, अशी मागणी गेले वर्षभर प्रकल्प समर्थकांनी लावून धरली आहे. स्थानिक आमदार व या भागाचे खासदार ती भेट घडवून देत नाहीत. प्रकल्प विरोधकांना मात्र मुख्यमंत्री लगेच भेट देतात, असा आरोप प्रकल्प समर्थकांकडून करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करूनही मुख्यमंत्री प्रकल्प समर्थकाना भेट देत नसल्याने ही भेट मिळण्यासाठी फार्डच्यावतीने मंगळवारी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर राजापूर दौऱ्यावर आलेल्या मंत्री अनिल परब यांना पत्रकारांनी 'मुख्यमंत्री समर्थकांची बाजू ऐकून घेणार आहेत का ?' असा प्रश्न विचारला. नाणार प्रश्नी जो काय निर्णय घ्यायचा आहे तो शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हेच घेतील. प्रकल्प समर्थकांनी त्यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे. त्यावर प्रक्रिया सुरु असून मुख्यमंत्री म्हणून ते त्यांची बाजू नक्कीच ऐकून घेतील, असे मंत्री परब यांनी स्पष्ट केले आहे.