Ratnagiri: हर्णै समुद्रकिनाऱ्यावरील स्टंटबाजी, पुण्यातील युवकावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 13:54 IST2025-10-27T13:53:46+5:302025-10-27T13:54:48+5:30
बंदी तरीही किनाऱ्यावर वाहन

Ratnagiri: हर्णै समुद्रकिनाऱ्यावरील स्टंटबाजी, पुण्यातील युवकावर गुन्हा
दापोली : समुद्रकिनाऱ्यावर कार नेऊन स्टंटबाजी करणाऱ्या पुण्यातील एका तरुण पर्यटकावर दापाेली पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (२४ ऑक्टाेबर) सकाळी ८ वाजण्याच्या सुमाराला घडला.
प्रतीक उद्धव दळवी (वय १९, रा. भुवरी - पुरंदर, पुणे) असे गुन्हा दाखल केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्याविराेधात काॅन्स्टेबल पंकज पवार यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमाराला प्रतीक हा कार (एमएच १२, डब्ल्यूटी १०२६) घेऊन हर्णै समुद्रकिनाऱ्यावर गेला हाेता. त्याठिकाणी तो इतरांच्या जीवाला धाेका निर्माण हाेईल, अशा पद्धतीने कार गाेल-गाेल फिरवून स्टंटबाजी करत हाेता. त्यामुळे त्याच्यावर दापाेली पाेलिस स्थानकात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १२५, २८१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिवाळीच्या सुट्टीमुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे गजबजून गेली आहेत. विशेषत: जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची माेठ्या प्रमाणात गर्दी आहे. या किनाऱ्यांवर काही उत्साही पर्यटक वाहने नेऊन स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे पर्यटकांच्या जीवितास धाेका निर्माण हाेऊ शकताे. त्यामुळे पाेलिसांनी स्टंटबाजी करणाऱ्या युवकावर कारवाईचा बडगा उगारला आहे.
बंदी तरीही किनाऱ्यावर वाहन
जिल्ह्यातील सर्वच किनाऱ्यांवर वाहने नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. किनाऱ्यावर वाहने जाऊ नयेत, यासाठी रस्ते बॅरिकेट्स, लाकडी ओंडक्यांनी बंद करण्यात आले आहेत. तरीही प्रतीक दळवी याने किनाऱ्यावर कार नेऊन स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला.
पुन्हा स्टंटबाजीचा प्रकार
दापाेली तालुक्यात पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून किनाऱ्यावर वाहन नेऊन स्टंटबाजी करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. गतवर्षी तालुक्यातील मुरुड, हर्णै येथे असे प्रकार घडले हाेते. तर गत सप्टेंबर महिन्यात कर्दे समुद्रकिनाऱ्यावर पुण्यातील पर्यटकाकडून स्टंटबाजी करताना जीप उलटल्याची घटना घडली हाेती. त्यानंतर आता पुन्हा हर्णै समुद्रकिनाऱ्यावर स्टंटबाजीचा प्रकार घडला आहे.