Ratnagiri: कर्दे समुद्रकिनाऱ्यावर स्टंटबाजी, चालकावर गुन्हा दाखल; गाडी लावतो म्हणत झाला पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 13:00 IST2025-09-15T12:58:34+5:302025-09-15T13:00:12+5:30
थार जीप उलटून चालक गाडीतून बाहेर फेकला गेला, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही

Ratnagiri: कर्दे समुद्रकिनाऱ्यावर स्टंटबाजी, चालकावर गुन्हा दाखल; गाडी लावतो म्हणत झाला पसार
दापोली : तालुक्यातील कर्दे समुद्रकिनारी भरधाव वेगाने वाहन चालवताना थार जीप उलटून अपघात झाला . या अपघातात चालक गाडीतून बाहेर फेकला गेला, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर चालक गाडी घेऊन घटनास्थळावरून फरार झाला. या अपघातप्रकरणी दापोली पोलिस स्थानकात अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा अपघात ११ सप्टेंबर रोजी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास कर्दे येथील समुद्रकिनारी झाला हाेता. कर्दे येथील पोलिस पाटील सोनल संदीप खामकर (वय ४५) आणि स्थानिक रहिवासी राकेश जाधव यांना समुद्रकिनाऱ्यावर एक थार जीप (एमएच १२, एक्सटी १७८८) भरधाव वेगाने जाताना दिसली. चालक जीप धोकादायक पद्धतीने, वर्तुळाकार वळणे घेऊन चालवत होता, ज्यामुळे स्वतःच्या आणि इतर पर्यटकांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. याच दरम्यान चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ती उलटली. अपघातानंतर चालक गाडीतून बाहेर फेकला गेला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि पाेलिस पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी उलटलेली जीप सरळ केली.
या घटनेची फिर्याद पोलिस पाटील सोनल खामकर यांनी दिल्यानंतर अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक यादव करत आहेत.
गाडी सुरक्षित ठिकाणी लावतो
समुद्रकिनाऱ्यावर उलटलेली गाडी पाेलिस पाटील आणि तेथील स्थानिकांनी मदत करून सरळ केली. याच संधीचा फायदा घेत ‘गाडी सुरक्षित ठिकाणी लावतो’ असे सांगून चालकाने गाडीसह घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, पाेलिसांनी गाडीच्या क्रमांकावरून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.