Ratnagiri Crime: घाटीवळे रुळाजवळ सापडला अज्ञात नेपाळी तरुणाचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 17:15 IST2025-12-29T17:14:48+5:302025-12-29T17:15:06+5:30
खिशात सापडले चेकबुक, मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा तपास पाेलिस करत आहेत

संग्रहित छाया
साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील घाटीवळे येथील रेल्वे रुळालगत असणाऱ्या गटारात सुमारे २५ वर्षांच्या एका अनोळखी नेपाळी तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार रविवारी (२८ डिसेंबर) सकाळी पावणेआठ वाजता उघडकीला आला. या तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे कळू शकलेले नाही.
याबाबतची माहिती पोलिस पाटील दीपक कांबळे यांनी साखरपा पोलिसांना दिली. त्यानंतर साखरपा पोलिस दूरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहायक पोलिस फौजदार शांताराम पंदेरे, हेडकॉन्स्टेबल संजय करंडे, कॉन्स्टेबल स्वप्निल कांबळे यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची पाहणी केली.
हा मृतदेह अंदाजे २५ वर्षांच्या तरुणाचा असून, त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याची उंची ५ फूट ५ इंच असून, रंग गोरा आणि अंगावर जीन्स पॅंट व काळे फुल शर्ट आहे. पाेलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा तपास पाेलिस करत आहेत.
खिशात सापडले चेकबुक
या तरुणाच्या खिशात चेकबुक सापडले असून, ते नेपाळ बॅंक लि.चे आहे. त्यावर लक्ष्मी गीरी साम दिलमया गीरी असे नाव लिहिलेले होते. मात्र, हे चेकबुक त्याचेच आहे का, हे निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे नावाचा उलगडा हाेत नसल्याचे देवरुखचे पोलिस निरीक्षक उदय झावरे यांनी सांगितले. जिल्ह्यात कामासाठी आलेल्या व ज्यांच्याकडे नेपाळी माणसे कामाला आहेत त्यांना याबाबत माहिती मिळाल्यास साखरपा किंवा देवरुख पोलिस स्थानकाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.