रत्नागिरी जिल्ह्यात महाविकास आघाडीत फूट, पालिकांसाठी ६९१ उमेदवारी अर्ज दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 15:05 IST2025-11-18T15:04:58+5:302025-11-18T15:05:35+5:30
Local Body Election: बंडखोरीचा चटका महायुतीलाही बसण्याची शक्यता, सर्वाधिक अर्ज कुठं आले... वाचा

रत्नागिरी जिल्ह्यात महाविकास आघाडीत फूट, पालिकांसाठी ६९१ उमेदवारी अर्ज दाखल
रत्नागिरी : वाढलेल्या राजकीय महत्त्वाकांक्षा, पक्षांमध्ये झालेली फाटाफूट, तीन-तीन पक्ष एकत्र आल्याने जागावाटपात झालेला गाेंधळ या साऱ्यामुळे जिल्ह्यातील चार नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींच्या निवडणुकीत चांगलेच राजकीय धुमशान झाले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जिल्ह्यात नगरसेवकांच्या १५१ जागांसाठी तब्बल ६३५ अर्ज दाखल झाले तर ७ नगराध्यक्षपदांसाठी ५६ अर्ज दाखल झाले. यातील जवळपास निम्मे अर्ज शेवटच्या दिवशी दाखल झाले आहेत. चिपळुणात महायुतीसहमहाविकास आघाडीमध्ये फूट पडल्याने तेथेच सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर, चिपळूण आणि खेड या चार नगरपरिषदा आणि लांजा, देवरुख व गुहागर या तीन नगरपंचायतींमध्ये निवडणूक होत आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी प्रत्येक ठिकाणी उमेदवार, कार्यकर्त्यांचा महापूर आला होता. जिल्ह्यात सात ठिकाणी मिळून नगराध्यक्षपदासाठी ५६ अर्ज आले आहेत. अध्यक्षपदासाठी सर्वाधिक १३ अर्ज चिपळूणमध्ये तर सर्वात कमी ५ अर्ज राजापूरमध्ये दाखल आहेत.
जिल्ह्यातील सदस्यांच्या १५१ जागांसाठी ६३५ अर्ज दाखल झाले आहेत. रत्नागिरीत ३२ जागांसाठी १३२, चिपळुणात २८ जागांसाठी १४१, खेडमध्ये २० जागांसाठी ८२, राजापूरमध्ये २० जागांसाठी ६५, गुहागरमध्ये १७ जागांसाठी ५६, देवरुखमध्ये १७ जागांसाठी ७९ तर लांजातील १७ जागांसाठी ८० अर्ज दाखल झाले आहेत.
दोन्ही राष्ट्रवादींना फटका
- जिल्ह्यात सर्वाधिक फटका महाविकास आघाडीला आणि त्यातही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसना बसला आहे. रत्नागिरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीला सोबत घेत स्वतंत्र अर्ज दाखल केले आहेत.
- चिपळुणात महायुतीने राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार) विश्वासात न घेतल्याने त्यांनी स्वतंत्र अर्ज दाखल केले आहेत. चिपळुणात महाविकास आघाडीतील उद्धवसेनेने सर्वच जागांवर उमेदवार उभे केले आहेत. नगराध्यक्षपदासाठी तर महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी अर्ज दाखल केले आहेत.
- महायुतीमध्ये शिंदेसेना आणि भाजपमध्ये जागा वाटपातील कुरबुरीमुळे काही ठिकाणी भाजपने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे महायुतीलाही काही ठिकाणी फटका बसणार आहे.