Ratnagiri: बेपत्ता तरुणीच्या मित्राचा अटकपूर्व जामीन मंजूर, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी झाला होता गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 14:55 IST2025-07-12T14:55:00+5:302025-07-12T14:55:24+5:30

असा केला युक्तिवाद

Anticipatory bail granted to friend who was booked in connection with the suicide of a young woman who went missing in the sea near Bhagwati Temple in Ratnagiri | Ratnagiri: बेपत्ता तरुणीच्या मित्राचा अटकपूर्व जामीन मंजूर, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी झाला होता गुन्हा दाखल 

Ratnagiri: बेपत्ता तरुणीच्या मित्राचा अटकपूर्व जामीन मंजूर, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी झाला होता गुन्हा दाखल 

रत्नागिरी : येथील भगवती मंदिरानजीकच्या पाण-भुयार स्पॉटजवळ समुद्रात बेपत्ता झालेल्या सुखप्रीत धाडिवालला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तिच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मित्राने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात केलेला अर्ज शुक्रवारी मंजूर करण्यात आला.

जस्मिक केहर सिंग (वय २९, सध्या रा. सिद्धिविनायक नगर, शिवाजीनगर, रत्नागिरी मूळ रा. भाटिया कॉलनी फतेहाबाद, हरयाणा) असे या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात बेपत्ता सुखप्रीतचे वडील प्रकाशसिंग धाडिवाल (६९, रा. एलनाबाद, जि. सिरसा हरयाणा) यांनी रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात गुरुवार, ३ जुलै रोजी तक्रार दिली होती.

सुखप्रीत बेपत्ता झाल्याप्रकरणी त्यांनी तेथील पिंपळगाव (नाशिक) पोलिस स्थानकात खबर दिली होती. या चौकशीदरम्यान ती रत्नागिरी येथे गेल्याचे त्यांना समजले. त्यामुळे त्यांनी रत्नागिरी गाठली. घटनास्थळी सापडलेली चप्पल आणि ओढणी आपल्या मुलीचीच असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या मुलीला तिच्या मित्राने, जस्मिक केहर सिंग याने आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याची तक्रार त्यांनी दिली आहे. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानंतर जस्मिक याने ५ जुलै राेजी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला हाेता. त्यावर संशयिताचे वकील अॅड. सचिन पारकर यांनी युक्तिवाद केला. त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने जस्मिकला ५० हजारांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

असा केला युक्तिवाद

सुखप्रितने नाशिकलाच सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यामध्ये कोणाचेही नाव नाही. तिच्या आत्महत्येस ती स्वतः जबाबदार आहे. सुखप्रितने २७ जूनपासूनच आपला मोबाइल बंद ठेवून नंतर तो रत्नागिरीत सुरू केला. त्या कालावधीत ती कुठे होती याची माहिती जस्मिकला नव्हती. तसेच त्याने तिला कधीही कॉल केलेला नाही किंवा रत्नागिरीला बोलाविलेले नाही. तसेच तिचा आतापर्यंत कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे तिने आत्महत्या केली किंवा नाही याबाबत कोणताही पुरावा मिळालेला नाही.

Web Title: Anticipatory bail granted to friend who was booked in connection with the suicide of a young woman who went missing in the sea near Bhagwati Temple in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.