Accident News Ratnagiri: मोकाट जनावराला दुचाकीची धडक, अपघातात क्रीडा शिक्षकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 14:09 IST2022-06-07T14:07:08+5:302022-06-07T14:09:34+5:30
रस्त्यावरील जनावराला त्याच्या दुचाकीची जोराची धडक झाली. यामध्ये त्याच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली हाेती.

Accident News Ratnagiri: मोकाट जनावराला दुचाकीची धडक, अपघातात क्रीडा शिक्षकाचा मृत्यू
रत्नागिरी : मोकाट जनावरावर दुचाकी धडकून झालेल्या अपघातातरत्नागिरीतील क्रीडा शिक्षकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ओंकार बाणे (रा. गुरुमळी, रत्नागिरी) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. हा अपघात उद्यमनगर येथील चंपक मैदानासमोरील रस्त्यावर काल, सोमवारी रात्री उशिरा झाला.
ओंकार बाणे साेमवारी रात्री जेवण आटाेपून जरा जाऊन येताे, असे सांगून घराबाहेर पडला हाेता. त्यानंतर मात्र, त्याच्या मृत्यूचीच बातमी घरी येऊन धडकली आणि साऱ्यांनाच धक्का बसला. ताे परटवणे येथून साळवी स्टाॅपच्या दिशेने येत असताना उद्यमनगर येथील चंपक मैदानासमाेर आला असता रस्त्यावरील जनावराला त्याच्या दुचाकीची जोराची धडक झाली. यामध्ये त्याच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली हाेती.
अपघातानंतर ताे बराच वेळ तेथेच पडून हाेता. तेथील ग्रामस्थांनी त्याच्या माेबाईलवरील शेवटचा काॅल पाहून त्यावर संपर्क साधला. हा काॅल त्याच्या मामांकडे लागताच त्यांनी या अपघाताची माहिती दिली. त्यानंतर त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डाेक्याला जाेरदार मार बसल्याने त्याचा मृत्यू झाला.
ओंकार खो-खो, कबड्डी, क्रिकेट या खेळात निपुण होता. रत्नागिरी शहरातील गोगटे - जोगळेकर महाविद्यालयामध्ये गेल्या ६ वर्षापासून ताे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत होता. त्याच्या मृत्यूची बातमी समजताच त्याच्या मित्रांनी शासकीय रुग्णालयात धाव घेतली हाेती.