Ratnagiri: लग्नाचे आमिष दाखविले; मुलगीच बोलतेय असे भासविले, चॅटिंगही करीत होता अन् प्रौढास घातला गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 18:11 IST2025-09-27T18:10:08+5:302025-09-27T18:11:42+5:30
राजापूर : लग्न लावून देतो असे खोटे सांगून राजापुरातील एका ५० वर्षीय प्रौढाची १ लाख ८३ हजारांना फसवणूक केल्याचा ...

Ratnagiri: लग्नाचे आमिष दाखविले; मुलगीच बोलतेय असे भासविले, चॅटिंगही करीत होता अन् प्रौढास घातला गंडा
राजापूर : लग्न लावून देतो असे खोटे सांगून राजापुरातील एका ५० वर्षीय प्रौढाची १ लाख ८३ हजारांना फसवणूक केल्याचा प्रकार समाेर आला आहे. याप्रकरणी राजापूर पाेलिस ठाण्यात त्याच भागातील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सज्जाद अब्दुल रेहमान मस्तान (रा. डाेंगर-मुसलमानवाडी, राजापूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संशयित मुबीन फकीर कालू (रा. डाेंगर-मुसलमानवाडी, राजापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सज्जाद मस्तान यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. संशयिताने डिसेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीत सज्जाद मस्तान यांना सबा शेख नावाच्या मुलीशी लग्न लावून देताे असे खाेटे सांगून लग्नाचे आमिष दाखविले.
त्यानंतर त्याने सज्जाद मस्तान यांच्याकडून राेख ५० हजार आणि ऑनलाइन १ लाख ३३ हजार रुपये घेतले. आपल्याला खाेटे आश्वासन देऊन आपली फसवणूक केल्याचे मस्तान यांच्या लक्षात येताच त्यांनी राजापूर पाेलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी पाेलिसांनी संशयितावर भारतीय दंड विधान कलम ४१९, ४२० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास राजापूर पाेलिस करीत आहेत.
मुलगीच बाेलतेय असे भासविले
संशयिताने सज्जाद मस्तान यांच्याशी माेबाइलवरून संपर्क साधला हाेता. त्यांच्याशी बाेलताना सबा शेख ही मुलगीच बाेलत असल्याचे त्याने भासविले हाेते. एवढेच नव्हे, तर त्यांच्याशी चॅटिंगही करीत हाेता. त्यानंतर त्याने सज्जाद यांच्याकडून रक्कम उकळली.