कशेडी घाटासह आता बोगद्यावरही दरडीचे संकट, रत्नागिरी-रायगड जोडणाऱ्या घाट आणि बोगदा मार्गावर वाहतूक धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 15:24 IST2025-07-16T15:24:22+5:302025-07-16T15:24:48+5:30
दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

कशेडी घाटासह आता बोगद्यावरही दरडीचे संकट, रत्नागिरी-रायगड जोडणाऱ्या घाट आणि बोगदा मार्गावर वाहतूक धोक्यात
खेड : मुंबई-गोवा महामार्गावर तालुक्यातील कशेडी घाटात दरड उलटून काही तास होण्याआधीच घाटाला पर्याय असलेल्या बोगद्याजवळही दोनदा दरड काेसळली आहे. चालू वर्षीच्या पावसात दुसऱ्यांदा असा प्रकार घडला असल्याने या मार्गावर आता दुहेरी संकट ओढवले आहे. दरडी हटवण्याचे काम तत्काळ सुरू करण्यात आले आहे.
सोमवारी सायंकाळपासूनच पावसाची संततधार कायम आहे. मध्यरात्री वादळसदृश वाऱ्यासोबत मुसळधार पाऊस कोसळल्याने मंगळवारी पहाटेच्या सुमारास बोगद्याच्या अगदी जवळ गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर दरड कोसळली होती. ती दरड हटवण्यात आल्यानंतर दुपारी पुन्हा मोठ्या प्रमाणात माती आणि दगडांचा ढिगारा रस्त्यावर कोसळला.
सुदैवाने, ही मार्गिका आधीच बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या मार्गावरील वाहतूक यामुळे ठप्प झाली असून, मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
दरम्यान, केवळ कशेडी बोगद्यावरच नव्हे तर जुन्या कशेडी घाटातही दरड कोसळल्याने रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या दोन्ही मार्गांवर दरडीचे दुहेरी संकट निर्माण झाले आहे. पोलादपूर तालुक्यातील भोगाव येथील घाटरस्त्यावर दरड कोसळल्याने कशेडी बोगद्याला पर्यायी असणारा मार्गही बंद झाला आहे. परिणामी, या दोन्ही मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे.
दरम्यान, दरड हटवण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा आणि जेसीबी मशिनरी घटनास्थळी कार्यरत आहे. जिल्हा प्रशासन, पोलिस आणि महामार्ग प्राधिकरण या सर्वच यंत्रणा सतर्क आहेत. नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय या मार्गाचा वापर टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
थोडक्यात घटनाक्रम
- मंगळवारी पहाटे आणि दुपारी दोन वेळा कशेडी बोगद्याजवळ दरड कोसळली.
- पहाटे दरड कोसळल्यामुळे संबंधित मार्गिका आधीच बंद होती; मोठी दुर्घटना टळली.
- जुन्या कशेडी घाटातही दरड कोसळल्याने पर्यायी मार्गही ठप्प
- वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून दरड हटवण्याचे काम सुरू
- मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याच्या घटना वाढण्याची शक्यता