Ratnagiri: खेडमधील प्रमुख धरणे ओव्हरफ्लो, सांडव्यावरून विसर्ग सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 18:01 IST2025-07-01T17:58:57+5:302025-07-01T18:01:10+5:30
नातूवाडी, शिरवली, पिंपळवाडी धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग सुरू

Ratnagiri: खेडमधील प्रमुख धरणे ओव्हरफ्लो, सांडव्यावरून विसर्ग सुरू
खेड : तालुक्यातील सर्वच प्रमुख धरणे शंभर टक्के भरली असून, धरण क्षेत्रामध्ये जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच सरासरी १५०० मिलिमीटर एवढी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे खेड तालुक्यातील ज्या भागांना उन्हाळ्यात धरणाच्या पाण्याचा उपयोग होतो, त्या गावांसाठी ही आनंदाची बातमी आहे. यंदा २० मेपासूनच पावसाने सुरुवात केल्याने जुलै महिन्याच्या पंधरवड्यात ओव्हर फ्लो होणारी धरणे जून महिन्याच्या अखेरीस पूर्ण क्षमतेने भरली आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली असली, तरी नियमित पावसाची हजेरी लागत असल्यामुळे यावर्षी धरणात पुरेसा पाणी साठा होईल, अशी अशा आहे. तालुक्यातील नातूनगर भागात नातूवाडी व शिरवली धरण प्रकल्प आहे. शिव खाडीपट्टा भागात कोंडिवली धरण, पंधरागाव विभागात तळवट-शेलारवाडी गणवाल धरण, शेल्डी धरण, सातगाव खोपी विभागात शिरगाव पिंपळवाडी धरण प्रकल्प राज्य सरकारने पूर्णत्वास नेले आहेत. मात्र, नातूवाडी व शिरगाव धरण वगळता अन्य धरणातील पाण्यातून किती हेक्टर शेत जमीन ओलिताखाली येते हा संशोधनाचा भाग आहे. कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आलेल्या या धरणात पाणीसाठा दरवर्षी होत असतो, परंतु त्याचा योग्य पद्धतीने वापर होणे अपेक्षित आहे.
तालुक्यातील नातूवाडी मध्यम पाटबंधारे प्रकल्प शिरवली लघु पाटबंधारे व पिंपळवाडी लघु पाटबंधारे तीनही प्रमुख धरणे शंभर टक्के भरली आहेत. शेलारवाडी मध्यम पाटबंधारे प्रकल्प ५१.३५ टक्के भरला असून, तळवट धरणामध्ये देखील ७२.३२ टक्के पाणीसाठा झाला आहे. मात्र, नातूवाडी व शिरवली धरण सोडले, तर अन्य धरणातील पाण्याचा वापर शेतीसाठी अत्यल्प प्रमाणात वापर होताे. पिंपळवाडी धरणातील पाण्यावर खासगी वीज निर्मिती प्रकल्प आहे. मात्र, शेतीसाठी या पाण्याचा वापर करण्यासाठी शासनास्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे.
धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग सुरू
नातूवाडी धरणातून २४ जून रोजी दुपारी ३ वाजता, शिरवली धरणातून १५ जून रोजी पहाटे ५ वाजता, तर पिंपळवाडी धरणातून १७ जून रोजी सकाळी १० वाजता विसर्ग सुरू झाला.
खेड तालुक्यात २५ जूनपर्यंत धरणात झालेला पाणीसाठा (आकडे दशलक्षघन मीटरमध्ये)
धरण - क्षमता - पाणीसाठा
- तळवट धरण : ४.८५ : ४.६७
- शेलारवाडी धरण : १०.१४ : ८.०४६
- नातूवाडी धरण : १८.३७७ : १८.३७७
- पिंपळवाडी धरण : १८.८९५ : १७.९४८
- कोंडिवली धरण : २.९६१ : २.५५५
- शिरवली धरण : २.९९७ : ३.३६५