Ratnagiri: पुढाऱ्यांनी फुकट गावात फिरू नये; नेट द्या, मत घ्या; अज्ञाताने लावलेला फलक चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 18:51 IST2025-11-20T18:47:49+5:302025-11-20T18:51:42+5:30
रत्नागिरी जिल्ह्यात 'या' गावातील फलकाची चर्चा

Ratnagiri: पुढाऱ्यांनी फुकट गावात फिरू नये; नेट द्या, मत घ्या; अज्ञाताने लावलेला फलक चर्चेत
चिपळूण (जि. रत्नागिरी) : मत हवं असेल तर रस्ता करा, पाखाडी करा, समाज मंदिर बांधा, गावाला नळपाणी योजना द्या, अशा अनेक सार्वजनिक मागण्या आतापर्यंत आपण पाहिल्या आहेत. मात्र, चिपळूण तालुक्यातील तळवडे येथे चक्क मत हवं असेल तर नेट द्या, अशा आशयाचा फलक कुणी अज्ञाताने लावला असून, त्याची जोरदार चर्चा सगळीकडे सुरू आहे.
या गावात इंटरनेटची सुविधा नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यासाठी हा फलक लावण्यात आला आहे. आता निवडणुकीच्या निमित्ताने तरी याची दखल राजकीय पक्षांचे लोक घेतील, अशी चर्चा ग्रामस्थ करत आहेत.
शिक्षण, आरोग्य, बँकिंग, सरकारी सेवा अशा प्रत्येक बाबतीत आता इंटरनेट अत्यावश्यक असतानाही एकाही टेलिकॉम कंपनीचा येथे मोबाइल टॉवर नाही. त्याचे पडसाद जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकीनिमित्त फलकाच्या रुपाने उमटले आहेत.
‘पुढाऱ्यांनी फुकट गावात फिरू नये, आमच्या भावना समजून घ्या... नेट घ्या, मत द्या!’ असा स्पष्ट शब्दातील संदेश या फलकावर आहे. याखाली ‘तळवडे गाव म्हणतंय आता गावात इंटरनेट कनेक्शन पाहिजेच!’ असा इशाराही दिला आहे.