लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण केले अन् दुसरीशीच लग्न उरकले; रत्नागिरीतील तरुणावर पोक्सोसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 12:08 IST2025-10-18T12:08:37+5:302025-10-18T12:08:53+5:30
तरुणाला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण केले अन् दुसरीशीच लग्न उरकले; रत्नागिरीतील तरुणावर पोक्सोसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा
चिपळूण : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार चिपळुणातून समोर आला आहे. याप्रकरणी येथील पोलिस स्थानकात रत्नागिरीतील एका तरुणावर पोक्सोसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणाला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
आदित्य समीर बने (वय २५, रा. निरूळ-हिंगेचीवाडी, रत्नागिरी), असे संशयित तरुणाचे नाव आहे. आदित्य व पीडित तरुणी साडेसतरा वर्षांची असल्यापासून दाेघांमध्ये प्रेमसंबंध होते. तिला त्याने लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र, त्यानंतर अलीकडच्या काही महिन्यांत तो कामानिमित्त सावंतवाडी येथे गेला होता. तिथे एका तरुणीशी त्याचे प्रेमसंबंध जुळले व त्याने तिच्याशी विवाह केला. याचवेळी संबंधित पीडित तरुणी त्याला लग्नाबद्दल विचारत असे. मात्र, तो तिचे बोलणे टाळत होता. लग्नाचे आमिष दाखवून त्याने आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने फिर्याद दाखल केली.
या फिर्यादीनुसार पोलिसांनी तरुणावर पोक्सो व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले असता १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास चिपळूण पोलिस करीत आहेत.
पोक्सो कायद्यांतर्गत सलग दुसरा गुन्हा
चिपळुणात सलग दुसऱ्या दिवशी पोक्सो कायद्यांतर्गत आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल हाेताच चिपळूण हादरून गेले आहे.