Ratnagiri: अल्पवयीन मुलीला पळवणाऱ्या तरुणाला आंबा येथून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 13:24 IST2024-12-05T13:23:32+5:302024-12-05T13:24:13+5:30
देवरुख : एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणाला देवरुख पोलिसांनी आंबा येथून मंगळवारी अटक ...

Ratnagiri: अल्पवयीन मुलीला पळवणाऱ्या तरुणाला आंबा येथून अटक
देवरुख : एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणाला देवरुख पोलिसांनी आंबा येथून मंगळवारी अटक केली आहे. गणेश आनंदा जाधव (२४, रा. केर्ले, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याला देवरुख न्यायालयात हजर केले असता ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
देवरुख पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक होत आहे. देवरुख पोलिस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, देवरुखनजीकच्या हातीव येथील एका अल्पवयीन मुलीची व गणेश जाधव या तरुणाची देवरुख बसस्थानकावर भेट झाली होती. यानंतर ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १०:०० वाजण्याच्या सुमारास त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. आपली मुलगी सायंकाळपर्यंत घरी न आल्याने तिच्या वडिलांनी अज्ञात व्यक्तीविरोधात देवरुख पोलिस स्थानकात फिर्याद दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता १३७ (२), ८७ कलमान्वये दाखल करून शोध घेण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी माहिती घेतली असता त्याचे नाव गणेश जाधव असल्याचे समजले. पोलिस त्याचा शोध घेत होते. मात्र, त्याचा थांगपत्ता लागत नव्हता. अखेर तो आंबा येथे असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी आपले सहकारी सहायक पोलिस निरीक्षक नामदेव जाधव, हेडकॉन्स्टेबल प्रशांत मसुरकर, सागर मुरुडकर, सचिन पवार, हवालदार अभिषेक वेलवणकर यांच्यासह मंगळवारी सकाळी १०:०० वाजता आंबा गाठले.
गणेश त्या मुलीसोबत एका पडक्या घरात असल्याचे दिसले. यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन देवरुख येथे आणले व मुलीला घरच्यांच्या ताब्यात दिले. गणेश जाधव याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला दि. ९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक अतुल जाधव करत आहेत.