Ratnagiri: अल्पवयीन बालकावर अत्याचार, व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर केला व्हायरल; दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 12:54 IST2026-03-14T12:54:14+5:302026-03-14T12:54:43+5:30
पाेलिसांकडून कसून तपास सुरु

संग्रहित छाया
रत्नागिरी : एका अल्पवयीन बालकावर लैंगिक अत्याचार करून त्या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार २२ फेब्रुवारी राेजी घडली असून, गुरुवारी (१२ मार्च) ताे उघडकीला आला असून, रात्री उशिराने गुन्हा दाखल करुन रत्नागिरी शहर पोलिसांनी दाेन तरुणांना अटक केली आहे.
जुबेर सलीम शेख (वय २२) आणि मुस्तकीन गडकरी (वय २४, दाेघेही रा. राजीवडा, रत्नागिरी) अशी अटक केलेल्या दाेघांची नावे आहेत. या प्रकारानंतर पीडित बालक घाबरलेल्या अवस्थेत असल्याने त्याने सुरुवातीला या प्रकाराची कल्पना पालकांना दिली नव्हती. मात्र, संशयितांनी या कृत्याचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला हाेता.
ताे पीडित मुलाच्या वडिलांच्या गुरुवारी निदर्शनाला आला. या व्हिडिओतील मुलगा आपला असल्याचे पाहिल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला. या घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी क्षणभरही विलंब न लावता थेट रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात फिर्याद दिली.
पालकांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी दाेघांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांसह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पाेक्साे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कायद्यातील तरतुदींनुसार, तसेच, व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्यामुळे माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांकडून कसून तपास सुरु
घटनेचे गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेता, या प्रकरणाचा तपास शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांनी आपल्या हाती घेतला आहे. पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून, त्यांनी हा व्हिडिओ आणखी कुठे प्रसारित केला आहे का, याचा तांत्रिक तपास पोलिस करत आहेत.