प्रवाशांना चॉकलेटमधून गुंगीचे औषध देऊन चोरी, रेल्वेच्या आरसीएफ पथकाने चोरट्यास शिताफीने पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 11:51 IST2025-07-10T11:49:54+5:302025-07-10T11:51:01+5:30

बेशुद्धावस्थेतील प्रवाशांना आरपीएफने उपचारासाठी पनवेलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले

A thief who gave two passengers in Konkan Kanya Express a sedative in chocolate and stole their mobile phones and wallets has been arrested | प्रवाशांना चॉकलेटमधून गुंगीचे औषध देऊन चोरी, रेल्वेच्या आरसीएफ पथकाने चोरट्यास शिताफीने पकडले

प्रवाशांना चॉकलेटमधून गुंगीचे औषध देऊन चोरी, रेल्वेच्या आरसीएफ पथकाने चोरट्यास शिताफीने पकडले

रत्नागिरी : कोकण कन्या एक्स्प्रेसमधील २ प्रवाशांना चाॅकलेटमधून गुंगीचे औषध देऊन त्यांचे मोबाइल आणि पैशांचे पाकीट पळविणाऱ्या चोरट्याला कोकण रेल्वेच्या आरसीएफ पथकाने मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास संगमेश्वर स्थानकावर शिताफीने पकडले. बेशुद्धावस्थेतील दोन प्रवाशांना आरपीएफने उपचारासाठी पनवेलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. गोकुळ हिराजी तोता, (चिखलदरा, जिल्हा अमरावती) आणि अशोक कुमार राजभर (पुरुलिया, पश्चिम बंगाल) अशी त्यांची नावे आहेत.

गुन्हे आणि गुप्तचर शाखा, रत्नागिरीचे निरीक्षक संजय वत्स, पीआर अमोल पाटील, पीआर कोकरे हे कोकण कन्या एक्स्प्रेसमध्ये ड्युटीवर होते. ही ट्रेन संगमेश्वर रेल्वे स्थानकावर थांबल्यानंतर मोहम्मद उस्मान घनी (वय २५ वर्षे) नावाचा संशयित मागील जनरल कोचमधून खाली उतरला आणि संशयास्पदरीत्या पुन्हा स्लीपर कोचमध्ये चढला. गुन्हे गुप्तचर शाखेच्या पथकाला संशय आल्याने त्यांनी त्याला अडवले. त्याच्याकडचे ३ मोबाइल ताब्यात घेत चिपळूण स्टेशनवर उतरवले.

चिपळूणला त्याची कसून चौकशी केली असता तो बिहारचा रहिवासी असून, मुंबईतील अंधेरी येथील बांधकामावर कामगार म्हणून काम करतो. दादरमध्ये भेटलेल्या राजू नामक व्यक्तीने त्याला काही चॉकलेट देऊन मडगावला पाठवले होते, अशी माहिती त्याने दिली. मंगळवार, ८ रोजी तो मडगाववरून जनरल कोचमध्ये प्रवास करताना त्याने शेजारी बसलेल्या २ व्यक्तींशी मैत्री केली आणि ETIVAN गोळी मिसळलेले चाॅकलेट दोघांना दिले. रत्नागिरी स्टेशनजवळ दोघेही बेशुद्ध पडले. त्यांचे मोबाइल आणि एकाच्या खिशातील पर्सची चोरी केली.

ही ट्रेन संगमेश्वर रेल्वे स्थानकावर थांबली, तेव्हा आरोपी कोच बदलून स्लीपर कोचमध्ये गेला. मात्र, तिथे त्याला पकडण्यात आले. निरीक्षक संजय वत्स आरोपी आणि चोरी केलेल्या वस्तूंसह रत्नागिरीला आल्यावर रत्नागिरीच्या निरीक्षकांच्या पथकाने पुन्हा चाैकशी केली.

जप्त केलेल्या बॅगेत बेशुद्ध केलेल्या प्रवाशांंचे कपडे, २ मोबाइल फोन (प्रत्येकी ११,००० आणि १०,००० रुपये किमतीचा), ७१० रुपये असलेली पर्स तसेच अशोक कुमार राजभर यांचे नाव लिहिलेले आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पॅन कार्ड, ३ एटीएम आणि चॉकलेट प्लास्टिकच्या पिशवीत आढळले.

रेल्वेतून प्रवास करताना कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून कोणतीही गोष्ट खाऊ अगर पिऊ नका. प्रवासात सतर्क राहा. - सचिन देसाई, जनसंपर्क अधिकारी, कोकण रेल्वे

Web Title: A thief who gave two passengers in Konkan Kanya Express a sedative in chocolate and stole their mobile phones and wallets has been arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.