Ratnagiri: खासगी शिकवणी शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, गैरकृत्याचा व्हिडीओही केला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 15:49 IST2025-07-26T15:49:17+5:302025-07-26T15:49:59+5:30
गावात प्रचंड संतापाची लाट उसळली

Ratnagiri: खासगी शिकवणी शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, गैरकृत्याचा व्हिडीओही केला
खेड : तालुक्यातील एका ग्रामीण भागात खासगी शिकवणीमध्ये शिक्षकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. संबंधित संशयित आरोपीने आपल्या त्या गैरकृत्याचे मोबाइलमध्ये व्हिडीओ चित्रित करून फोटोही काढल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे गावात प्रचंड संतापाची लाट उसळली असून, ग्रामस्थांनी संबंधित आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. खेडपोलिस स्थानकात संशयित आरोपीविरोधात विनयभंग आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी संशयित आरोपीच्या मोबाइल आणि इतर डिजिटल साधनांची तपासणी केली असता, त्यामध्ये अनेक महिलांचे व मुलींचे फोटो आणि व्हिडीओ असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले असून, या संशयिताने याआधीही अशा प्रकारची कृत्ये केली असावीत, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
गावातील महिला आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून, या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. संबंधित संशयितावर गुन्हा दाखल झाला असून, त्याला अटक करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.