सतत रडणाऱ्या चिमुकलीच्या तोंडात आईने कोंबला बोळा, गुदमरून झाला मृत्यू; रत्नागिरीतील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 13:37 IST2025-09-26T13:36:47+5:302025-09-26T13:37:00+5:30
बहिणीला शंका आली अन् सारे उलगडले

सतत रडणाऱ्या चिमुकलीच्या तोंडात आईने कोंबला बोळा, गुदमरून झाला मृत्यू; रत्नागिरीतील धक्कादायक घटना
रत्नागिरी : सतत रडत असल्याच्या रागातून आईने आठ महिन्यांच्या मुलीच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून नाक दाबल्याने चिमुकलीचा गुदमरून मृत्यू झाला. हा धक्कादायक प्रकार शहरानजीकच्या कुवारबाव-पारसनगर येथे बुधवारी सायंकाळी घडला. हुरेन आसिफ नाईक असे मृत चिमुकलीचे नाव असून तिची आई शाहिन आसिफ नाईक (वय ३६) हिला न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
शाहिन नाईक ही लग्नानंतर चिपळूण तालुक्यातील अलोरे येथे राहत होती. काही दिवसांपूर्वी ती माहेरी कुवारबाव-पारसनगर येथे राहायला आली होती. वडील आजारी असल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. त्यांची देखभाल करण्यासाठी शाहिनची लहान बहीण रुग्णालयात गेली होती. घरात कोणीही नसल्याने सतत रडत असलेल्या हुरेनचा तिला राग आला. तिने मुलीच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला. त्यानंतर तिचे नाक दाबले. त्यामुळे गुदमरून हुरेनचा मृत्यू झाला.
या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर रत्नागिरी ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल हाेऊन शाहिन नाईक हिला अटक केली. तिला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
बहिणीला शंका आली अन् सारे उलगडले
शाहिनची धाकटी बहीण सायंकाळी घरी आल्यावर तिला हुरेन हिचा आवाज न आल्याने तिने बहिणीकडे विचारणा केली. त्यावर तिने हुरेन झोपली असल्याचे सांगितले. परंतु, तिच्या बहिणीला शंका आल्याने तिने हुरेन हिला घेऊन जिल्हा शासकीय रुग्णालय गाठले. त्यावेळी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.