Ratnagiri: रघुवीर घाटात पुन्हा दरड कोसळली, विद्यार्थ्यांसह प्रवासी तीन तास अडकून
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 17:31 IST2025-07-04T17:31:23+5:302025-07-04T17:31:41+5:30
चार दिवसांत दुसरी घटना

Ratnagiri: रघुवीर घाटात पुन्हा दरड कोसळली, विद्यार्थ्यांसह प्रवासी तीन तास अडकून
खेड : रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांतील कांदाटी खोऱ्यातील सुमारे २० गावांना जोडणाऱ्या रघुवीर घाटात बुधवारी मध्यरात्री पुन्हा एकदा दरड कोसळल्याचा प्रकार घडला. त्यामुळे गुरुवारी सकाळी या मार्गावरून येणारी आकल्पे-खेड बस तीन तास अडकून पडली हाेती. ही दरड हटविल्यानंतर तीन तासांनंतर ही बस मार्गस्थ झाली. मात्र, त्यामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांचे हाल झाले.
रघुवीर घाटात दरड कोसळल्यामुळे बुधवारी सायंकाळी ४ वाजता वस्तीला गेलेली अकल्पे येथून खेडकडे येणारी एस.टी. बस तीन तास घाटातच अडकून पडली होती. या बसमध्ये कांदाटी खोऱ्यातील शिंदी, वळवण आदी गावातून खेड तालुक्यातील खोपी येथील शाळेत जाणारे विद्यार्थीही होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यंत्रणेने घटनास्थळी पोहोचून ही दरड बाजूला केली. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली. दरड हटविल्यानंतर सकाळी ८:३० वाजता खेडमध्ये पोहोचणारी आकल्पे खेड एस.टी. बस तब्बल तीन तास उशिराने, म्हणजे ११:३० वाजता खेड बसस्थानकात पोहोचल्याची माहिती खेडचे आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के यांनी दिली.
चार दिवसांत दुसरी घटना
रघुवीर घाटात दरड काेसळण्याच्या वारंवार घटना घडू लागल्या आहेत. चार दिवसांत ही दुसरी घटना घाटात घडली आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांसह आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घाटातील वाहतूक धाेकादायक ठरू लागली असून, प्रशासनाने या भागातील सुरक्षेची अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी हाेत आहे.