Ratnagiri: देवरुखनजीक झाडाझुडपात आढळला कुजलेला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 14:37 IST2026-03-21T14:36:20+5:302026-03-21T14:37:25+5:30
मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत परिसरात तर्कवितर्क

Ratnagiri: देवरुखनजीक झाडाझुडपात आढळला कुजलेला मृतदेह
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील मारळ फाटा ते कळकदरा मार्गावरील झाडाझुडपात एका प्रौढाचा पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या मृतदेहाची ओळख पटली असून, ते आंगवली भगतवाडी येथील संतोष राजाराम अणेराव (वय ५२) असल्याचे समोर आले आहे.
देवरुख पोलिस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, मारळ फाटा परिसरातून उग्र कुजकट वास येत असल्याची माहिती मारळचे पोलिस पाटील देवदास चंद्रकांत सावंत यांना गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मिळाली. त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या गवताळ भागात एका पुरुषाचा मृतदेह अत्यंत विदारक स्थितीत असल्याचे त्यांना दिसले. पूर्ण मृतदेह कुजलेला होता.
मृत व्यक्तीच्या अंगावर राखाडी रंगाची पँट, काळपट टी-शर्ट, डोक्यावर लाल टोपी आणि जवळच एक टॉवेल सापडला. पोलिसांनी या घटनेची तत्काळ नोंद घेत तपास केला असता, सदर मृत व्यक्ती ही आंगवली भगतवाडी येथील संतोष राजाराम अणेराव (वय ५२) असल्याचे समोर आले.
ही घटना १९ मार्च २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी घडली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून, देवरुख पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. संतोष अणेराव यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत परिसरात तर्कवितर्क लढवले जात आहेत. पोलिस अधिक तपास करत असून, वैद्यकीय अहवालानंतर अधिक माहिती समोर येईल, अशी अपेक्षा केली जात आहे.