रत्नागिरी जिल्ह्यात शोध मोहिमेत आढळले कुष्ठरोगाचे ९ रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 13:24 IST2024-12-30T13:23:22+5:302024-12-30T13:24:05+5:30

५७३ संशयित रुग्ण

9 leprosy patients found in search operation in Ratnagiri district | रत्नागिरी जिल्ह्यात शोध मोहिमेत आढळले कुष्ठरोगाचे ९ रुग्ण

रत्नागिरी जिल्ह्यात शोध मोहिमेत आढळले कुष्ठरोगाचे ९ रुग्ण

रत्नागिरी : जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात आली असून, एकूण ३२,८५० लोकांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीमध्ये ५७३ संशयित सापडले असून, त्यापैकी ९ जणांना कुष्ठरोग झाल्याचे निदान झाले आहे.

जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, सहायक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. विवेकानंद बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र अंतर्गत आरोग्य विभागाकडून कुष्ठरुग्ण शोध मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेतील कामाचे पर्यवेक्षण करणारे आरोग्य विभागाचे संबंधित अधिकारी व पर्यवेक्षक तसेच प्रत्यक्ष रुग्णांचे सर्वेक्षण व तपासणी करणारे आरोग्य कर्मचारी यांनी या मोहिमेत उत्तम काम केले.

जिल्ह्यातील चिरेखाण कामगार, बागांमधील रखवालदार व तिथे वास्तव्य करणारे शेतमजूर तसेच बाहेरून कामानिमित्ताने जिल्ह्यात आलेल्या स्थलांतरित व्यक्ती, औद्योगिक वसाहतीतील कामगार, बांधकाम मजूर, आश्रमशाळा व वसतिगृहात राहणारे विद्यार्थी, तसेच कारागृहातील कैदी यासारख्या सर्व जोखीमग्रस्त भागात ही शोध मोहीम राबविण्यात आली होती.

या मोहिमेपुरते मर्यादित न राहता यापुढेही आरोग्य कर्मचारी आपल्या नियमित गृहभेटीत नागरिकांची तपासणी करणार आहेत. तसेच फिकट लालसर बधीर चट्टा, तेलकट गुळगुळीत चमकदार त्वचा, कानाच्या जाड पाळ्या, दुखरे मज्जातंतू, हातापायाला मुंग्या येणे व अशक्तपणा अशी लक्षणे दिसल्यास नागरिकांनी त्वरित संपर्क संपर्क साधावा. - डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी.

Web Title: 9 leprosy patients found in search operation in Ratnagiri district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.