Ratnagiri ZP Election: रत्नागिरीत जिल्हा परिषदेसाठी ११, पंचायत समितींसाठी १६ अर्ज दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 13:51 IST2026-01-20T13:50:37+5:302026-01-20T13:51:56+5:30
शिंदेसेनेने आतापर्यंत दोन याद्या जाहीर केल्या

Ratnagiri ZP Election: रत्नागिरीत जिल्हा परिषदेसाठी ११, पंचायत समितींसाठी १६ अर्ज दाखल
रत्नागिरी : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आता दोनच दिवस शिल्लक असली तरी जागावाटप आणि उमेदवार निश्चिती झाली नसल्याने सर्व वातावरण ‘ठंडा ठंडा कूल कूल’ असेच आहे. तीन दिवसांत जिल्हा परिषदेच्या ५६ जागांसाठी ११ आणि पंचायत समित्यांमधील ११२ जागांसाठी फक्त १६ अर्ज दाखल झाले आहेत.
उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली. मात्र तीन दिवसांत २७ अर्जच दाखल झाले आहेत. त्यातील १६ अर्ज केवळ खेड तालुक्यातीलच आहेत. जिल्हा परिषदेसाठी आतपर्यंत ११ आणि पंचायत समित्यांसाठी १६ अर्ज दाखल झाले आहेत.
शिंदेसेना आणि भाजपची युती निश्चित झाली असली तरी अजूनही जागावाटपावरून अंतर्गत कुरबुरी आहेत. भाजपला जागा कमी मिळाल्या असल्याचा सूर काढला जात आहे. तरीही आतापर्यंत दोन याद्या शिंदेसेनेने जाहीर केल्या आहेत. भाजपने यादी जाहीर करण्याची तसदी न घेता शिंदेसेनेकडून पदरात पडलेल्या जागांवर उमेदवार उभे करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत दाखल झालेल्या अर्जांमध्ये शिंदेसेना, भाजप आणि अपक्षांचेच अर्ज आहेत.
उद्धवसेना, दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याकडून अजून एकही अर्ज दाखल झालेला नाही.
जिल्ह्यात महाविकास आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे उद्धवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी सोमवारी जाहीर केले. मात्र आता अर्ज भरण्यासाठी दोनच दिवसांची मुदत आहे. त्यामुळे आघाडीचा निर्णय कधी होणार, याकडे कार्यकर्ते डोळे लावून बसले आहेत.